वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या आठवडे बाजारांवर वाहतूक पोलीस व पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाईची मागणी

पुणे : वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या मुख्य रस्त्यावरील तसेच पादचारी मार्गावरील आठवडे बाजार कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या आठवडे बाजार हे फुटपाथ व मुख्य रस्त्यांवर अनधिकृत रित्या भरवले जात आहे. याकडे पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असून वाहतूक पोलीस विभाग देखील याबाबत कारवाईची भूमिका घेत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

आठवडे बाजारांना मोकळ्या जागेमध्ये अथवा महानगरपालिकेच्या अमेनिटी स्पेस मध्ये  बाजार भरवण्याची परवानगी दिली जाते परंतु बाणेर बालेवाडी औंध पाषाण सुस महाळुंगे सुस रोड परिसरामध्ये आठवडे बाजार हे रस्त्यांवरच भरवले जातात. यामुळे आठवडे बाजाराच्या कालावधीत नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते. तसेच आठवडे बाजाराला येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्याच्या मधोमध उभी केली जात असल्याने अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो.

आठवडे बाजार हे राजकीय आशीर्वादाने मोठ्या नेत्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे या अनाधिकृत आठवडे बाजारांवर कारवाई देखील होत नाही. एरवी नो पार्किंग मध्ये गाडी लागल्यावर कारवाई करणारे वाहतूक पोलीस रस्त्याने भरवल्या जाणाऱ्या आठवडे बाजारांवर कारवाई करत नाहीत. तसेच बेशिस्तपणे वाहन पार्किंग करणाऱ्या नागरिकांवर देखील कारवाई करत नाहीत.

अनधिकृत आठवडे बाजारांवर सातत्याने कारवाई करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. वाहतुकीला अडथळे ठरणारे मुख्य रस्त्यांवर भरवले जाणारे आठवडे बाजार तातडीने बंद करण्यात यावेत तसेच संबंधित आठवडे बाजार भरवणाऱ्या खाजगी संस्थांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  सहकार महर्षी डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेविका 'श्री भैरवनाथ पुरस्कार' वितरण व दहावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न..