श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्सचा सोलापूरवर रॉयल विजय

धनराज शिंदे(नाबाद ४२),  प्रशांत सोळंकी(३-१२), अक्षय काळोखे(२-२६)यांची सुरेख कामगिरी

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चौथ्या  दिवशी धनराज शिंदेची उपयुक्त नाबाद ४२ धावांची खेळी, तर प्रशांत सोळंकी(३-१२), अक्षय काळोखे(२-२६) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने सोलापूर रॉयल्स संघावर ८२ धावांनी विजय मिळवत आपली विजयी मालिका कायम ठेवली.  

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात सोलापूर रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी यशस्वी ठरविला. सलामीचा फलदांज हर्षद खडीवाले(०धावा)ला विकी ओस्तवालने आपल्या गोलंदाजीवर दुसऱ्याच चेंडूवर झेल बाद केले. तर, मागच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अर्शिन कुलकर्णी(१८धावा)ला आज मोठी खेळी करता आली नाही. त्याला जलदगती गोलंदाज प्रणव सिंगने पायचीत बाद करून गोलंदाजीत चांगली साथ दिली.

वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे नाशिक संघ ३.५ षटकात ३बाद २८ असा अडचणीत सापडला. त्यानंतर कौशल तांबे(२७धावा) व सिद्धेश वीर यांनी चौथ्या गड्यासाठी ४० चेंडूत ५१ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी कौशलला सोलापूरच्या फिरकीपटू सुनील यादवने यष्टीच्या मागे झेल बाद करून नाशिकला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर धनराज शिंदेने २० चेंडूत ३चौकार व ३ षट्काराच्या नाबाद ४२ धावांची खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. धनराजला अक्षय काळोखे(१३धावा)ने साथ दिली व या दोघांनी सातव्या गड्यासाठी १४ चेंडूत ३७ धावांची भागीदारी करून संघाला १६१ धावांचे आव्हान उभे करून दिले.

१६१ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या सोलापूर रॉयल्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. नाशिकच्या प्रशांत सोळंकी(३-१२), अक्षय काळोखे(२-२६) या तीन फिरकी गोलंदाजांनी सोलापूरचा डाव १६.३ षटकात सर्वबाद ७९धावात उध्वस्त केला. यामध्ये लेगस्पिनर प्रशांत सोळंकी(३-१२), डावखुरा अक्षय काळोखे(२-२६) व अक्षय वाईकर(१-१२) यांचा मोलाचा वाटा होता. यात यश नाहर(१७धावा), यासर शेख(११धावा), ऋषभ राठोड(३२धावा) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.  

See also  भारताला मोठा धक्का; भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द,युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची कठोर कारवाई

डावखुरा फिरकीपटूअक्षय काळोखेने अथर्व काळे(7धावा) आणि सुनील यादव(0धावा) आपल्या हफ्त्यातील शेवटच्या चौथ्या षटकातील दोन चेंडूवर दोन बळी घेतले व आपले याचबरोबर षटकही पूर्ण केले. आता त्याला सोमवारी पुणेरी बाप्पा विरुद्ध होणाऱ्या लढतीत त्याने आपल्या पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यास त्याला एक अनोखी हॅट्रिक करण्याची संधी असणार आहे. 

ईगल नाशिक टायटन्स संघाला विजयाची हॅट्रिक साजरे करण्याची संधी

ईगल नाशिक टायटन्स संघाला सोमवारी सलग तिसऱ्या विजयाची संधी असली तरी त्यांच्यासमोर पुणेरी बाप्पा संघाचे कडवे आव्हान असणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघाकडून चमकदार कामगिरीच्या करणाऱ्या राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांच्यामधील झुंज पाहायला मिळणार आहे. राहुल त्रिपाठीला अजून म्हणावी तशी लय गवसलेली नाही हि त्या संघांची मूळ डोकेदुखी आहे. 

ईगल नाशिक टायटन्स संघाने सोमवारी होणाऱ्या पुणेरी बाप्पा विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर त्याना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकवण्याची संधी असणार आहे. 

आज(१८जुन २०२३ रोजी) रात्री आठ वाजता पुणेरी बाप्पा संघाचा सामना छत्रपती संभाजीनगर किंग्ज यांच्यात होणार आहे. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
ईगल नाशिक टायटन्स: २० षटकात ७बाद १६१ धावा(धनराज शिंदे नाबाद ४२(२०,३x४,३x६), सिद्धेश वीर २७, कौशल तांबे २७, मंदार भंडारी १९, अर्शिन कुलकर्णी १८, राहुल त्रिपाठी १०, अक्षय काळोखे १३, सुनील यादव २-२०, प्रणव सिंग २-३९, विकी ओस्तवाल १-२०) वि.वि.सोलापूर रॉयल्स: १६.३ षटकात सर्वबाद ७९धावा(ऋषभ राठोड ३२(३४,३x४), यश नाहर १७, यासर शेख ११, प्रशांत सोळंकी ३-१२, अक्षय काळोखे २-२६, अर्शिन कुलकर्णी १-८, अक्षय वाईकर १-१२); सामनावीर-धनराज शिंदे; ईगल नाशिक टायटन्स संघ ८२ धावांनी विजयी.