निळूभाऊंनी महात्मा फुलेंचा वारसा चालवला :  सुनील माने

पुणे : निळूभाऊ हे केवळ कलावंतच नव्हते तर ते समाजासाठी काम करणारे सच्चे समाजसेवक होते. त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवला, असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी व्यक्त केले.

निळू फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त निळूभाऊंवर निष्ठा व प्रेम असणाऱ्या विष्णू गरूड यांच्या विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी निळू फुले स्मृती कलागौरव पुरस्कार दिले जातात. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यंदाचे पुरस्काराचे हे १७ वे वर्ष होते.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण, चंद्रकांत गवळी, निवृत्त प्राध्यापक डॅा. गौतम बेंगाळे, आपटे प्रशालेचे प्राचार्य गौतम मगरे, स्वानंद प्राथमिक शाळेचे संस्थापक प्रशांत मनोरे, समाजवादी पार्टी महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य विनायक लांबे, श्रावण जाधव, तुषार कदम, आशाताई वाघचौरे, अशोक रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा आलेला शिवांग सुभाष जागडे, अभिनेत्री अर्चना पाटील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रायकर, क्रीडापटू स्नेहल बारवकर, करोना काळात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे अंजुम इनामदार, सामाजिक कार्यकर्ते शरद दबडे आणि क्रीडापटू मानसी ताजने यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, निळू फुले ख्यातनाम अभिनेते तर होतेच पण त्याचबरोबर ते सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत देखील होते. सामाजिक आणि कलाकारांच्या क्षेत्रात त्यांनी नेहमी मदतीचा हात देतानाच आपली सामाजिक जबाबदारी सांभाळली. डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासोबत आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या साथीने सामाजिक कृतज्ञता निधीसाठी दोन कोटी रुपये उभे करून गरजू कालावंतांना त्यांनी मोठी मदत केली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील केवळ विशिष्ट समाज घटकच नेतृत्व करण्यासाठी सतत पुढे का असतात यावर निळू भाऊंनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेची माहिती त्यांनी या कार्यक्रमात दिली. सध्या कोणत्याही विषयावर मतमतांतर व्यक्त करणे ही धोक्याची गोष्ट बनलेली असताना आणि वाद विवादाला महाराष्ट्रात मोठी परंपरा असताना आता घड्याळाचे काटे उलटे फिरू लागले आहेत असे दिसते. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला भ्याड हल्ला त्याचेच निदर्शक आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

See also  पुणे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा राज्यालाही दिशादर्शक ठरेल असा निर्माण करा- प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील