पुणे : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत औंध विभागातून पुणे महानगरपालिका शाळा क्र. 153 मुलांची, बावधन येथील शिक्षक श्री. उद्धव जालिंदर गोळे यांनी पखवाज वादनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
औंध विभागस्तरीय स्पर्धेत पखवाज वादनासाठी तृतीय क्रमांक मिळवल्यानंतर त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ही राज्यस्तरीय स्पर्धा 17 जानेवारी 2026 रोजी सांगली जिल्ह्यातील राजमाता महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील आठ विभागांतून तब्बल 40 स्पर्धकांनी वाद्यवादन प्रकारात सहभाग घेतला होता. या चुरशीच्या स्पर्धेतून उद्धव गोळे यांनी पखवाज वादनात संपूर्ण महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावला.
श्री. उद्धव गोळे यांना वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा लाभली आहे. त्यांचे वडील कै. ह.भ.प. जालिंदर रामभाऊ गोळे हे वारकरी संप्रदायातील मान्यवर होते. त्यांना पखवाज वादनाचे धडे कै. मृदंगमार्तंड बाबुरावजी डवरी गुरुजी, ह.भ.प. मृदंगाचार्य पांडुरंगजी दातार गुरुजी यांच्याकडून मिळाले असून, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.
आजवर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांना पखवाज वादनाची समर्पक साथ दिली असून सध्या देखील ते ही परंपरा जोपासत आहेत. तसेच सवाई गंधर्व महोत्सव यासह विविध प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी पखवाज वादन केले आहे. पं. उपेंद्र भट, पं. शौनक अभिषेकी, पं. हेमंत पेंडसे, पं. जयतीर्थ मेऊंडी, देवकीताई पंडित यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी पखवाजाची साथ दिली आहे.
सध्या श्री. उद्धव गोळे हे पुणे मनपा शाळा क्र. 153 मुलांची, बावधन येथे सेवेत असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.या राज्यस्तरीय यशाबद्दल वसुंधरा बारवे (उपायुक्त, शिक्षण विभाग पुणे मनपा), सुनंदा वाखारे (प्रशासकीय अधिकारी, पुणे मनपा), श्री. शिवाजी आढागळे (सहाय्यक प्रशासकीय अधिकारी), आनंदीबाई वणवे (पर्यवेक्षक, कोथरूड विभाग), नंदिनी साळवे मॅडम (मुख्याध्यापक, शाळा क्र. 153 बी), नवले मॅडम (मुख्याध्यापक, शाळा क्र. 82 बी) यांच्यासह शिक्षक व कर्मचारी वर्ग तसेच पाषाण–सुतारवाडी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
























