पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी दिनांक 18 रोजी सकाळी पाटील इस्टेट परिसराला भेट देऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष पाहिल्या.
स्थानिकांच्या दैनंदिन अडचणींवरही आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले. विशेषत: ड्रेनेज लाईन बदल, शौचालय स्वच्छता व दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि नवीन शौचालयांची आवश्यकता या मुद्द्यांवर उपाययोजना जाहीर करण्यात आल्या.
आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार येथे तातडीने ड्रेनेज कामाचे आदेश तसेच शौचालय दुरुस्तीची काम सुरू करण्यात येणार आहे.शौचालय स्वच्छतेबाबत आरोग्य विभाग यांना काटेकोर सूचना देण्यात आल्या. परिसरासाठी अतिरिक्त कर्मचारी देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली, आयुक्तांनी त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले
या वेळी उपायुक्त श्री. संदीप कदम (घनकचरा व्यवस्थापन), उपायुक्त श्री. अरविंद माळी (परिमंडळ २), सहायक आयुक्त श्री. तिमय्या जागले (घोले रोड क्षेत्रीय कार्यालय) तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यानंतर महानगरपालिकेमध्ये पाटील इस्टेट या झोपडपट्टी संदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सीईओ श्री. सतीश कुमार खडके, शहर अभियंता श्री. प्रशांत वाघमारे, सीओईपीचे श्री. बिराजदार सर तसेच संबंधित अधिकारी यांचे समवेत बैठक घेण्यात आली. पाटील इस्टेटमधील एस.आर.ए. प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असून, आवश्यक ती सर्व मदत महानगरपालिकेकडून करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त श्री नवल किशोर राम यांनी दिले दिले.