पुणे : भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अटल अंतर्गत “थ्री-डी प्रिंटिंग अँड डिझाईन” या अत्याधुनिक विषयावर १५ ते २० सप्टेंबर २०२५ दरम्यान सहा दिवसांची ज्ञानवर्धक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये देश-विदेशातील प्रमुख प्राध्यापक, संशोधक आणि उद्योगतज्ज्ञांनी उच्च दर्जाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा शुभारंभ विविध नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे अध्यक्ष प्रा. डॉ. महंतेश हिरेमठ, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, वरंगलचे प्रा. डॉ. वाय. रवीकुमार, तसेच भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राजेश प्रसाद उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी यावेळी सांगितले, “त्रिमितीय मुद्रण हे आजच्या युगातील क्रांतिकारी तंत्रज्ञान असून ते संशोधन आणि नवनिर्मितीला वेग देते. शिक्षकांना या तंत्रज्ञानाची सखोल जाण असली तरच विद्यार्थी या क्षेत्रात उत्कृष्ट प्रगती करू शकतात. या प्रशिक्षणाने शिक्षकांसाठी नव्या दालनांचा पाया तयार केला आहे.”
कार्यशाळेत त्रिमितीय मुद्रणाच्या ॲडिटीव्ह उत्पादन प्रक्रिया, रचना तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्रातील विविध उपयोग यावर सखोल व्याख्याने देण्यात आली. आयआयटी गुवाहाटीचे डॉ. साजन कपिल, ए.आय.एस.एस.एम.एस. पुण्याचे डॉ. संदीप वानखेडे, एन.एम.आय.एम.एस. मुंबईचे डॉ. गुरुप्रसाद कुप्पू राव यांसह अनेक तज्ज्ञांनी विज्ञान आणि उद्योग यांचा संगम साधला. उद्योगातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित इंडस्ट्री विजिट पॉझिट्रॉन ॲडिटीव्हच्या कार्यालयात श्री. अभिषेक शेटे, प्रमुख कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
कार्यशाळेचा समारोप युनायटेड किंग्डममधील एक्सेल त्रिमितीय तंत्राचे तांत्रिक संचालक श्री. उत्कर्ष अंकलखोपे यांच्या व्याख्यानाने करण्यात आला. या कार्यशाळेमुळे शिक्षकांना त्रिमितीय मुद्रणाचे आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनातील नवीन प्रवाह व उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयाचा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. सहभागी प्राध्यापकांनी महाविद्यालयाच्या या पुढाकाराबद्दल आभार मानले व कौतुक व्यक्त केले.
कार्यशाळेत प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार व उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे उपस्थित होते. सहसमन्वयक प्रा. डॉ. मिलिंद पटवर्धन यांनी कार्यक्रमाच्या यशात मोलाचा हातभार लावला व उपस्थितांचे आभार मानले.