बाणेर : पुणे महानगरपालिकेच्या आरक्षण सोडत झाल्यानंतर सूस बाणेर बालेवाडी प्रभाग क्रमांक 9 मध्ये भौगोलिक समतोल राखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मागील निवडणुकीत निवडून आलेल्या तीन नगरसेवकांपैकी एका माजी पालिका सदस्यला आपले तिकीट गमवावे लागणार असल्याची चर्चा सध्या प्रभागात जोर धरत आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये आरक्षण सोडत नंतर एक जागा एस.टी. महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर एक जागा ओबीसी पुरुष, तर महिला व सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी एक एक जागा राखीव पडली आहे. मागील वेळी प्रभागांमध्ये खुल्या वर्गातून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक एक उमेदवार निवडून आले होते. तर बाणेर मधूनच ओबीसी महिला व खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. आता एसटी आरक्षण पडल्यामुळे सर्वच पक्षांना एसटीचे उमेदवार शोधावे लागणार आहेत. यामुळे मागील वेळी निवडून आलेल्या उमेदवारांपैकी बाणेर परिसरातील एका उमेदवाराचे तिकीट भाजपाला उत्तर कोथरूड मतदार संघातील भौगोलिक समन्वय साधण्यासाठी कापावे लागण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये उत्तर कोथरूड मतदार संघात समाविष्ट असलेल्या पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी व बाणेर बालेवाडी या दोन भौगोलिक संलग्न असलेल्या परिसरामध्ये तिकीट वाटप करताना नेतृत्वाची कसरत पहायला मिळणार असून सध्याच्या माजी नगरसेवकांबरोबरच पक्षांमध्ये मागील काही वर्षापासून भाजपा मध्ये प्रवेश मिळवलेल्या कार्यकर्त्यांमध्ये देखील रस्सीखेच पाहायला मिळत असून यामध्ये विद्यमान आमदार चंद्रकांत दादा पाटील व खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून बांधणी सुरू असलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांचा एक सक्रिय गट देखील या तिकिटाच्या स्पर्धेमध्ये ताकतीने उतरण्याची तयारी करत आहे. यामुळे विद्यमान नगरसेवकांना आपले तिकीट वाचवण्याबरोबरच पक्षांतर्गत नाराजी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
सध्या भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदार संघातील उत्तर विभागांमध्ये सर्वाधिक उमेदवारांची संख्या भारतीय जनता पार्टी पक्षाकडे आहे. यामुळे पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत जोरदार बांधणी वेगवेगळ्या स्तरावर होत असल्याचे सध्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे कोणत्या माजी नगरसेवकांचे तिकीट कापले जाणार व भाजपाचे कोणत्या प्रवर्गात कोण उमेदवार असणार यावर महाविकास आघाडी चे उमेदवार रिंगणात उतरवले जाणार असल्याचे सध्या चित्र निर्माण झाले आहे.
























