मराठबोली पुणे आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत मुळशीतील ‘शिवतेज’ दिवाळी अंकास द्वितीय क्रमांक

पुणे : राज्यभरातून सहभागी झालेल्या नामांकित दिवाळी अंकांमध्ये आपल्या दर्जेदार साहित्य, विचारपूर्ण आशय आणि सातत्यपूर्ण प्रकाशन परंपरेच्या बळावर ठसा उमटवत ‘शिवतेज’ दिवाळी अंकाने पुण्यातील मराठबोली यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले असून, ग्रामीण भागातून सातत्याने जपल्या जाणाऱ्या सृजनशील साहित्य परंपरेला मिळालेला हा मानाचा सन्मान ठरला आहे.

दिवाळी अंकांच्या राज्यस्तरीय स्पर्धेसह काव्यवाचन व काव्यलेखन स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचा समारंभ नुकताच पुण्यातील पत्रकार भवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद अत्रे, तर प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत परब उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘शिवतेज’ दिवाळी अंकाचा सन्मान कार्यकारी संपादक केतन दत्तात्रय सुर्वे आणि प्रकाशक विनिता सुर्वे यांनी स्वीकारला.

मुळशी तालुक्यातील पहिला दिवाळी अंक म्हणून ओळख असलेला ‘शिवतेज’ तब्बल ३४ वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होत आहे. ज्येष्ठ संपादक स्व. दत्तात्रय सुर्वे यांनी या अंकाची पायाभरणी केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र केतन दत्तात्रय सुर्वे यांनी कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारत ही परंपरा कायम ठेवली असून अंकाचा दर्जाही यशस्वीपणे टिकवून ठेवला आहे.

यापूर्वीही ‘शिवतेज’ला १६ राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यंदाचा द्वितीय क्रमांक हा या प्रदीर्घ साहित्यसेवेचा सन्मान असल्याचे मानले जात आहे. परीक्षण समितीत पहिल्या फेरीत शरद अत्रे, दुसऱ्या फेरीत प्रिया खैरे पाटील, तर तिसऱ्या फेरीत कुसुम बोते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

या यशाबद्दल ‘शिवतेज’ दिवाळी अंकाच्या संपादक, लेखक, कवी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन होत असून मुळशी तालुक्याच्या साहित्यिक क्षेत्रात हा अभिमानाचा क्षण ठरल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. “सहकारी, जाहिरातदार, लेखक व वाचकांच्या प्रेमामुळेच हे यश मिळाले,” असे सांगत केतन सुर्वे यांनी हे यश स्व. दत्तात्रय सुर्वे यांना समर्पित केले. या समारंभास मराठबोली पुणे संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुरकुटे यांनी केले.

See also  राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बाणेर येथे वाहतूक पोलिसांची आरोग्य तपासणी

पुण्यातील मराठबोली यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ‘शिवतेज’ दिवाळी अंकाच्या वतीने कार्यकारी संपादक केतन दत्तात्रय सुर्वे व प्रकाशक वनिता सुर्वे यांनी स्वीकारले. पारितोषिक कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद अत्रे आणि प्रमुख पाहुणे हेमंत परब यांच्या हस्ते प्रदान‌ केला.