बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : प्रोलॉग स्पर्धेने दाखवून दिली भव्यतेची चुणूक ; मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघांत विजेतेपदासाठी चुरस

पुणे : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेअंतर्गत आजच्या प्रोलॉग रेसने आयोजनातील भव्यता आणि जागतिक स्तरावरील दर्जा अधोरेखित केला. जगभरातील ३५ देशांतील २८ नामवंत संघांचे १६४ आंतरराष्ट्रीय सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होत असून, सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवरून सुमारे ४३७ किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास करत विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहेत.

स्पर्धेचा उत्साहवर्धक पूर्वरंग असलेली ७.५ किलोमीटरची प्रोलॉग (टाइम ट्रायल) रेसला दुपारी १.३० वाजता सुरूवात झाली. शहरातील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्या स्पर्धकाला हिरवा झेंडा दाखवत अधिकृत सुरुवात केली. यावेळी, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राज्य क्रीडा व युवक कल्याण आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

या प्रोलॉग रेसमध्ये स्पर्धकांनी वैयक्तिक स्वरूपात एकामागोमाग एक मिनिटाच्या अंतराने सुरुवात केली. ही मास स्टार्ट रेस नसून, प्रत्येक सायकलपटूची वैयक्तिक वेळ निर्णायक ठरणार आहे. पुणेकर नागरिकांनी शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवरून जाणाऱ्या सायकलपटूंचे उत्साहात स्वागत केले.

स्पर्धेच्या पुढील टप्प्यांमध्ये आशिया खंडातील ७८, युरोपमधील ६९, तर ओशनिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडांतील सायकलपटू सहभाग घेत आहेत. भारताचा इंडियन डेव्हलपमेंट संघही या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला असून, देशांतर्गत सायकलिंगसाठी ही स्पर्धा मैलाचा दगड ठरणार आहे.

सुरक्षेच्यादृष्टीने स्पर्धा मार्गावर सुमारे १ हजार ५०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. यामध्ये स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, विशेष शाखा, बॉम्ब नाशक पथक तसेच शीघ्र कृती दलाचा समावेश होता. वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले. आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका आणि तांत्रिक सहाय्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती.

मंगळवार २० जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणारी बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही स्पर्धा पुणे व परिसराच्या क्रीडा, पर्यटन आणि जागतिक ओळखीला नवे परिमाण देणारी ठरणार आहे. आजचा प्रोलॉग हा या भव्य आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा केवळ पूर्वरंग असून, पुढील दिवसांत सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवर रंगणारी चुरस अधिक उत्कंठावर्धक ठरणार आहे.

See also  "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शांती मोर्चा ( पीस मार्च ) आयोजन "