बाणेर परिसरातील मित्रनगर कॉलनीत नाल्यात मैला व रासायनिक पाणी सोडल्याचा आरोप; कारवाईची मागणी

पुणे – बाणेर–म्हाळुंगे रोडवरील मित्रनगर कॉलनी येथील रहिवाशांनी नाल्यामध्ये ड्रेनेज, मैला व रासायनिक मिश्रित पाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. १९९८ पासून येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सांगितले की, कॉलनीलगतचा खुला प्लॉट पूर्वी पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी वापरला जात होता; मात्र मागील काही महिन्यांपासून त्यात मैला व केमिकलयुक्त पाणी सोडले जात असल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी वाढली आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, नाल्यातील पाणी पुढे न वाहता एका ठिकाणी साचून राहते. त्यामुळे डेंग्यू व चिकुनगुनिया सारख्या आजारांचा धोका वाढवणारे डास मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. कॉलनीत ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुले राहत असल्याने आरोग्याबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दिवसभर ड्रेनेजच्या पाण्याचा तीव्र वास येत असल्याने खिडक्या बंद ठेवून बसावे लागत असल्याची तक्रारही करण्यात आली.

नालेसफाईबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाला साफसफाई अपुरी होते, काढलेला राडारोडा व माती वेळेत उचलली जात नाही, झाडी–गवत वाढलेले राहते, तसेच काही ठिकाणी रहिवाशांकडून कचरा टाकला जात असल्याचे सांगण्यात आले. परिसरातील काही बोरवेलचे पाणी दूषित झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

यासोबतच, “ड्रेनेज लाईनचे पाईप गळत असून त्यातून सतत सांडपाणी झिरपत आहे,” असा आरोप रहिवाशांनी केला. तसेच, Syngenta कंपनीकडून दूषित पाणी नाल्यात सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

नागरिकांनी महापालिकेकडे खालील मागण्या केल्या आहेत :
नाल्यातील ड्रेनेज जोडण्या तात्काळ बंद करून गळती दुरुस्त करावी.साचलेले पाणी त्वरित काढून नियमित निचऱ्याची व्यवस्था करावी.संपूर्ण नालेसफाई करून राडारोडा व मातीचे योग्य नियोजन करावे.डास प्रतिबंधक औषधांची नियमित फवारणी करावी. दूषित पाण्याची तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुख्य कार्यालय व वार्ड कार्यालय यांच्यात जबाबदारी ढकलली जात असून, अनेक महिन्यांपासून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मित्रनगर कॉलनीतील रहिवाशांनी केली आहे.

See also  भाग ९ मधील वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा रोडमॅप; लहू बालवडकर यांनी मांडली ठोस विकासदृष्टी