पुणे : ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल (BBNG) तर्फे आयोजित वार्षिक बिझनेस कॉन्क्लेव्ह ‘परिवर्तन २०२६’ हा नुकताच वाकड येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे दिमाखात पार पडला. देश-विदेशातील १२०० हून अधिक ब्राह्मण उद्योजकांनी या मेगा संमेलनात सहभाग नोंदवत नेटवर्किंग, सहकार्य आणि व्यवसायवृद्धीचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
ब्राह्मण समाजातील उद्योजक, उद्योगपती व व्यावसायिकांना एकत्र आणून परस्पर सहकार्याची मजबूत साखळी निर्माण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. दोन दिवसीय कार्यक्रमात पॅनेल चर्चासत्रे, प्रेरणादायी व्याख्याने, फायरसाईड चॅट्स, बी-टू-बी कॉन्क्लेव्ह, पॉवरपॉईंट सादरीकरणे व परस्परसंवादी सत्रांचा समावेश होता. ‘परिवर्तन’चे कॅप्टन श्री. नंदन गुमास्ते यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला अखिल भारतीय संत समितीचे महासचिव परमपूज्य स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, राज्यसभेच्या सदस्या डॉ. मेधा कुलकर्णी, कामत हॉटेल्स समूहाचे कार्यकारी संचालकडॉ. विठ्ठल व्यंकटेश कामत, उद्योगपती श्री. प्रकाश भालेराव आणि श्री. उदय निरगुडकर यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते BBNG स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले तसेच प्रायोजकांचा सन्मान करण्यात आला.
पीएनजी ज्वेलर्स, पितांबरी ग्रुप आणि चितळे बंधू मिठाईवाले यांनी प्रायोजकत्व देत कार्यक्रमाला बळकटी दिली.
डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात भारतातील उद्योजकतेच्या संधींवर प्रकाश टाकत ब्राह्मण व्यावसायिक समुदायाच्या एकत्रीकरणावर भर दिला. स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी उद्योजकांनी सात्त्विकता, संयम व समाजसेवा जोपासावी, असे मार्गदर्शन केले. डॉ. विठ्ठल कामत यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचे अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरित केले.
बीबीएनजी ग्लोबलचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीपाद कुलकर्णी यांनी ‘परिवर्तन’च्या माध्यमातून धोरणात्मक व परस्परपूरक संबंध निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या वेळी ‘उद्यम कौस्तुभ पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमती अनघा व श्री. महेश पाठक, श्रीमती सुप्रिया श्रीकांत बडवे, डॉ. संजय मुकुंद पैठणकर, श्री. आनंद गानू, डॉ. अजय शेष, श्री. सुयोग नारावणे आणि श्री. राजीव पानसे यांचा डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक श्री. श्रीपाद कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. मुकुंद कुलकर्णी, महासचिव व कम्युनिकेशन संचालक श्री. अरविंद कोरहळकर, कार्यकारी संचालक (सस्टेनन्स) श्री. सुयोग नारावणे, प्रादेशिक संचालक सौ. ज्योत्सना गोडबोले व श्री. आनंद चितळे तसेच संयोजिका श्रीमती सिद्धी कुलकर्णी यांनी नेतृत्व केले. ऍड. व्योमा देशपांडे आणि डॉ. पूर्णिमा कुलकर्णी यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला विशेष उंची मिळाली.
























