अनंतराव पवार महाविद्यालयात शिवजयंती ‘उत्सव’ नव्हे तर ‘संस्कार’ म्हणून साजरी; शिवरायांना वैचारिक मानवंदना

पिरंगुट, पुणे :  पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालय येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ‘उत्सव’ म्हणून नव्हे, तर ‘संस्कार’ आणि वैचारिक जागर म्हणून अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संस्थेवर शोककळा पसरलेली असताना कोणताही थाटमाट किंवा झगमगाट न करता केवळ शिवविचारांचा जागर करण्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात शिवरायांच्या कार्याचा व विचारांचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो व प्राध्यापक वृंद यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व शिवरायांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

मराठी विभाग प्रमुख व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विजय बालघरे यांनी प्रास्ताविकातून शिवजयंतीचे महत्त्व आणि कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. श्वेता हुलावळे हिने दिलेल्या जयघोषाने आणि सादर केलेल्या पाळण्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोगतांचे सत्र पार पडले. सोनाली सरोदे, तुषार देव, प्रकाश आखाडे, अलिजा शेख आणि अबोली कोडगये यांनी आपल्या कविता व प्रभावी भाषणांतून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा दिला. दिव्या कोकाटे, पूजा पाईकराव, सेजल सांगळे व समीक्षा मुंडे यांनी सादर केलेल्या पोवाडा आणि शौर्यगीतांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.
डॉ. प्रकाश पांगारे यांनी शिवरायांच्या गनिमी कावा व प्रशासन कौशल्यावर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो म्हणाले, “आपण सध्या दुःखाच्या काळातून जात आहोत; मात्र शिवरायांचे विचार आपल्याला संघर्षातही संयम आणि धैर्य राखण्याची प्रेरणा देतात.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी गोरे हिने केले. आयोजन व नियोजन डॉ. विजय बालघरे आणि डॉ. गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केले. सेजल सांगळे हिने आभार प्रदर्शन केले. शिवगर्जनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अत्यंत साधेपणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमातून महाविद्यालयात शिवविचारांचा जागर घुमला, तसेच साश्रूनयनांनी स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

See also  धर्म हि मार्केटिंग करण्याची गोष्ट नाही- सुषमा अंधारे ; पाषाण बाणेर लिंकरोड येथे डॉ.दिलीप मुरकुटे यांच्या वतीने दिवाळी सरंजाम वाटप