पुणे महानगरपालिका हद्दीत दुषित पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न; विकसकांवर कारवाईची अमोल बालवडकर यांची मागणी

पुणे : म्हाळुंगे परिसरातील नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये दुषित पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. VTP Belair, VTP Leonara, VTP Alpine, VTP Atherieus, Kool Ecoloch Society, Godrej Hillside 1 & 2, Godrej River Hills तसेच Godrej Green Clove या सोसायट्यांतील रहिवाशांनी या संदर्भात तक्रार नोंदवली आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.


सुमारे ६००० सदनिका धारक व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. संबंधित भाग पूर्वी Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) हद्दीत होता आणि नुकताच Pune Municipal Corporation (पुणे मनपा) हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. या भागात सध्या मूलभूत नागरी सुविधा विकसकांकडून पुरवल्या जात असून त्याबदल्यात प्रति चौ. फूट ३ रुपये प्रतिमहिना दर आकारला जातो. मात्र, रहिवाशांच्या म्हणण्यानुसार VTP Realty व VTP Township Management यांच्या गैरव्यवस्थापनामुळे पाणीपुरवठा दूषित होत असून हे पाणी पिण्यास अयोग्यच नव्हे तर वापरण्यासही अयोग्य असल्याचे आढळून आले आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक व स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विकसकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तसेच आयुक्तांनी संबंधित गृहप्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

See also  मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण – मंत्री उदय सामंत