गुरुवार पेठेत कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती रॅली

गुरुवार पेठेत कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती रॅली
पुणे : पुणे महानगरपालिका अंतर्गत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक २६ मधील गुरुवार पेठ आरोग्य कोठी परिसरात आज जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. परिसरातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.

रॅलीदरम्यान बलवार आळी, गौराई आळी आणि काची आळी या भागांतील नागरिक, पथारी धारक तसेच दुकानदारांना घरगुती व व्यावसायिक ठिकाणी निर्माण होणारा कचरा इतरत्र न टाकता आपल्या दारात येणाऱ्या स्वच्छच्या कचरा वेचकांकडेच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या जनजागृती उपक्रमात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक श्री. तोसिफ देशपांडे, नगरसेविका ऐश्वर्याताई सम्राट थोरात यांच्या स्वीय सहाय्यक पायगुडे मॅडम, तसेच स्वच्छ संस्थेचे समन्वयक स्मिता पवार, वैभव साबळे व स्वच्छ सभासद उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देत स्वच्छ सभासदांकडेच कचरा सुपूर्द करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

See also  एपस्टीनचा कोठडीत मृत्यू; अशोक खरातचे काय? : सुनील माने