पुणे : आगामी २०२६–२७ अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची आज स्थायी समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट देत कामांची सद्यस्थिती आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये बाणेर येथील ‘आपुलकी’ कॅन्सर सेंटर, संगमवाडी येथील नदी सुधार प्रकल्पांतर्गत पार्किंग सुविधा, साधू वासवाणी उड्डाणपूल, मुंढवा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.), केशवनगर–खराडी उड्डाणपूल तसेच राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे भेट देण्यात आली.
पाहणीदरम्यान सर्व प्रकल्पांची गुणवत्ता अबाधित राखत कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले. नागरिकांना अधिक सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
विकासकामांचा सातत्याने आढावा घेत कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी अधिक समन्वयाने काम करण्याचेही सांगण्यात आले. या पाहणी दौऱ्यात स्थायी समिती अध्यक्ष मा. श्रीनाथ यशवंत भिमाले, सर्वपक्षीय सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
























