पुणे : पहिल्याच अवकाळी पावसात पुणे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपवर जोरदार टीका करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“अवकाळी पावसात पुणे तुंबले, भाजपने पुणेकरांना हेच दिले का?” असा सवाल करत उबाठा गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शहरातील पायाभूत सुविधा कोलमडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, असेही पक्षाने म्हटले आहे.
शिवसेना उबाठा ने म्हटले की, पुणेकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात राजकीय पाठबळ दिले आहे. शहरातून एक खासदार, सहा आमदार, तब्बल ११९ नगरसेवक, तसेच केंद्र आणि राज्यात मंत्रिपदे दिली. मात्र, या सर्व सत्तेच्या जोरावरही पुणेकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“एवढे भरभरून समर्थन देऊनही पुणेकरांना पावसात जलतरण करावे लागत आहे. हीच का विकासाची परतफेड?” असा रोखाही शिवसेनेने व्यक्त केला आहे.
दरम्यान, शहरात वारंवार उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना उबाठा कडून करण्यात आली आहे.
























