बाणेर रोड लवकरच मोकळा श्वास घेणार; मेट्रो कामांना गती देण्याचे निर्देश

पुणे : बाणेर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असून, सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नगरसेविका मयुरी राहुल कोकाटे यांच्या पुढाकारातून आज संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात महा मेट्रो, पुणे महानगरपालिका (PMC) आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मेट्रोच्या कामांमुळे प्रलंबित असलेल्या केबल लाईन, खराब झालेले रस्ते, तसेच सेवा वाहिन्यांच्या शिफ्टिंगसारख्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

महा मेट्रोच्या मुख्य अभियंता रीनाज पठाण यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, मेट्रो स्टेशनखाली सुरू असलेली खोदकाम व लाईन शिफ्टिंगची कामे १५ एप्रिलपर्यंत पूर्ण केली जातील. त्यानंतर संबंधित रस्ता तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरळीत केला जाईल. तसेच बाणेर रोडवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.

सेवा वाहिन्यांच्या कामांमुळे नुकसान झालेल्या फूटपाथची दुरुस्ती तातडीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेविका मयुरी कोकाटे यांनी नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की, १६ एप्रिल रोजी पुन्हा एकदा कामांचा आढावा घेण्यात येणार असून उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील.

या पाहणीवेळी पुणे मनपाच्या पथविभागाचे अधिकारी अशोक वाघमारे, दिलीप काळे, शिवानंद पाटील, तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे उत्तम जाधव, शिवम बालवडकर, वैदेही बापट, अस्मिता करंदीकर, श्वेता पांडे, निलेश सायकर, प्रवीण आमले, प्रकाश तापकीर व शिवसिंग यांनीही उपस्थिती दर्शवली.

See also  ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव गिरी महंत बाभूळगांवकर शास्त्री यांचा होणार सन्मान आळंदी येथे ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे रविवारी होणार वितरण