बालेवाडीत स्व. अजितदादा पवार यांचे स्मारक उभारण्याची मागणी; WAMA Women’s Club चे महापौरांना निवेदन

पुणे, दि. १० (प्रतिनिधी): बालेवाडी परिसरातील आरक्षित जागेवर उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी WAMA Women’s Club च्या अध्यक्षा पूनम विशाल विधाते यांनी पुणे महानगरपालिकेच्या महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, बालेवाडी येथील जकात नाक्यासाठी पूर्वी आरक्षित असलेली जागा नंतर मेट्रो स्टेशनसाठी राखीव करण्यात आली आहे. मात्र, सदर ठिकाणी काही उर्वरित जागा उपलब्ध असून ती स्मारकासाठी वापरता येऊ शकते, असे नमूद करण्यात आले आहे.

पुणे शहर तसेच महाराष्ट्र राज्याच्या विकासात स्व. अजितदादा पवार यांचे मोठे योगदान राहिले असून त्यांच्या कार्याचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी योग्य ठिकाणी स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच, बालेवाडी परिसर हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. नॅशनल हायवे क्रमांक ४ (NH-4) लगत असल्याने या ठिकाणी उभारण्यात येणारे स्मारक पुण्याच्या ओळखीचे भव्य आणि मानाचे ठिकाण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

यामुळे उर्वरित जागेवर स्व. अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारून त्यांच्या कार्याला योग्य श्रद्धांजली वाहण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच या मागणीवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

See also  गोंगाटात विचार हरवू नका' २५ वर्षांची स्पीकरची परंपरा मोडीत काढून १ हजार अनुयायांना पुस्तक वाटप व मूकपटाचे ऐतिहासिक आयोजन