मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यात पाणीटंचाई तीव्र; बंधारे कोरडे, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा;टेमघर धरणातून पाणी सोडण्याची मागणी

वार्ताहर | मुळशी:
मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यात सध्या पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून कातवडी-डावजे नदीवरील बंधारे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. मुठा विभागासाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या मुठा नदीला टेमघर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पाणी न सोडल्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती, बागायती शेती तसेच दुग्ध व्यवसायावर आधारित जनावरे आहेत. पाण्याअभावी पिके वाचवणे कठीण झाले असून जनावरांसाठीही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकताच मे महिना सुरू झाला असताना अशी भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मुठा खोऱ्यात अनेक गावे वसलेली असल्याने पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरत आहे. संबंधित सिंचन विभागाने तात्काळ दखल घेऊन बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, जर लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही, तर शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अमित कुंडले, राम गायकवाड, सरपंच रामचंद्र काळोखे, तानाजी हाळंदे, रमेश पवार, समीर शिंदे, लहू तिकोने, सार्थक दिघे, आकाश भरेकर आणि अक्षय हरपुडे यांनी दिला आहे.

See also  कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय जीवघेण्या बेकायदेशीर मांजा विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर दमदार भरारी पथकाची शोध मोहिमेद्वारे दंडात्मक कारवाई