पुणे, प्रतिनिधी : एकीकडे पुणे शहराला स्मार्ट सिटी म्हणून देशभरात ओळख मिळत असताना, दुसरीकडे शहरातील काही भागांमध्ये आजही मूलभूत गरजांसाठी महिलांना कष्टाची पराकाष्ठा करावी लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. बाणेर परिसरातील रस्त्यावर डोक्यावर सरपणाची मोळी घेऊन घरगुती वापरासाठी जात असलेल्या महिलांचे दृश्य पाहून विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, उज्ज्वला (गॅस) योजना, लाडकी बहीण योजना यांसारख्या विविध योजनांची मोठ्या प्रमाणात घोषणा केली जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी अजूनही सरपणावर अवलंबून राहावे लागत असल्याचे या चित्रातून दिसून येत आहे. त्यामुळे योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बाणेरसारख्या विकसित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरातही महिलांना डोक्यावर सरपण वाहून न्यावे लागत असल्याने सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे वास्तव अधोरेखित होत आहे. स्मार्ट सिटीच्या चमकदार प्रतिमेमागे दडलेले हे वास्तव प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
महिला सक्षमीकरणाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामधील दरी कमी करण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, स्वच्छ इंधनाचा सर्वसामान्यांना सहज लाभ आणि गरजू कुटुंबांपर्यंत शासकीय मदत पोहोचविणे आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
“स्मार्ट सिटीच्या झगमगाटामागे अजूनही कष्टकरी महिलांच्या डोक्यावर सरपणाची मोळी आहे; हेच खरे वास्तव आहे,” अशी चर्चा या घटनेनंतर परिसरात सुरू झाली आहे.















