पुणे : दिवंगत कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या जयंतीनिमित्त रिक्षा चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत नेत्रतपासणी व मोफत चष्मा वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र नॅचरल गॅस, शिवरूद्र प्रतिष्ठान ट्रस्ट आणि रिक्षा पंचायत समिती पुणे-पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शांता निकेतन रिक्षा संघटना आणि कै. बाबुराव गेनबा शेवाळे रिक्षा स्टॅण्ड संलग्न रिक्षा पंचायत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम शनिवारी (दि. १३ जून २०२६) पुणे आयटी पार्क आवार, भाऊ पाटील रोड येथील शांता निकेतन रिक्षा स्टॅण्डजवळ सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक नगरसेविका सौ. सपना आनंद छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक आनंद छाजेड, रिक्षा पंचायत पुणे-पिंपरी चिंचवडचे विद्यमान अध्यक्ष नितीन पवार, आप्पासाहेब वाडेकर, कमलाकर गायकवाड, बाबू दीक्षित, राहुल पाखरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी शिबिराचा लाभ घेतला.
या उपक्रमामध्ये रिक्षा चालकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार कोणत्याही नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात आले. चालकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
सदर कार्यक्रम वनवर्धिनी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. विजय रमेश ढोणे यांच्या बहुमोल सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रिक्षा पंचायतचे प्रतिनिधी रमेश सूर्यवंशी यांनी केले.रिक्षा चालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वांच्या सहभागामुळे यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
















