पुणे, प्रतिनिधी : मुळशी तालुक्यातील नागरिकांची वाढती लोकसंख्या तसेच हिंजवडी आयटी पार्क परिसराचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेऊन भविष्यातील पाणीपुरवठा नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) आकुर्डी येथील कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
‘मुळशी टप्पा-१ व टप्पा-२’ तसेच माण, मारुंजी आणि हिंजवडी पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीला उपस्थित राहून स्थानिक नागरिकांच्या पाणी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच संबंधित पाणीपुरवठा प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (ऑनलाईन व्हीसीद्वारे), पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रियाज पठाण, शिवप्रसाद बागडी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र डुबल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा तसेच एमआयडीसीचे उपअभियंता सतिश थिगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुळशी, माण, मारुंजी आणि हिंजवडी परिसरातील नागरिकांना भविष्यात पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनांना विशेष महत्त्व असून, प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर या योजनांमुळे परिसरातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
— पुणे बुलेटिन
















