पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत गोंधळ; दर्गा हटवण्याच्या मुद्द्यावर भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

पुणे, प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत आज बोपोडी येथील मेट्रो मार्गाखालील दर्गा हटवण्याच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गफूर पठाण यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करताच भाजप नगरसेवक आक्रमक झाल्याने काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बोपोडी परिसरातील मेट्रो मार्गाखाली असलेला दर्गा महापालिकेकडून हटविण्यात आला आहे. याबाबतचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गफूर पठाण यांनी मुख्य सभेत उपस्थित केला. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली.

सभागृहातील वातावरण तापल्याने काही भाजप नगरसेवक थेट गफूर पठाण यांच्या आसनापर्यंत पोहोचले. या गोंधळामुळे त्यांना आपली भूमिका पूर्णपणे मांडता आली नसल्याचे सांगितले जात आहे. काही काळ दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांनी विरोधकांच्या अंगावर धावून जात दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तर भाजपकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

या प्रकारामुळे मुख्य सभेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले. महापालिकेतील या राजकीय संघर्षाची शहराच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

See also  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश