पुणे : शहरातील गुन्हेगारी रोखणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करायला हवे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केले आहे.
पोलीस मित्र संघटनेच्या ओळखपत्र वाटप कार्यक्रमात कपोते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी तुरूंग अधिक्षक चंद्रमणी इंदुलकर, आयकर अधिकारी महेश जासनानी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, डॉ.गुरुवीर सिंग मखीजा, काश्मीर नागपाल, विरमित सिंग मैनी, पोलीस संघटना महिला शहर अध्यक्ष बॉबी करणानी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाढती लोकसंख्या, वाढती वाहतूक, पर प्रांतातून येणारे लोक, वाढणारी गुन्हेगारी यासाठी नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. पोलीस आपले काम प्रामाणिक करत आहेत. परंतु वाहतूक व्यवस्थेत पोलिसांना मदत करणे वाहतुकीचे नियम पाळणे, सण उत्सव या काळात बंदोबस्तात पोलिसांना सहकार्य करणे, शहरातील अवैध धंद्याची, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची पोलिसांना माहिती देणे अश्या अनेक गोष्टी आपण करू शकतो, तसेच शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीही पोलिसांना सहकार्य करू शकतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केले. या कार्यक्रमात ३५० सदस्यांना ओळख पत्र देण्यात आली या मध्ये १०० महिलांचाही समावेश आहे. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेनी झाली. हा कार्यक्रम पोलीस मित्र संघटना, पूना ऑटोमोबाईल कल्चर सर्कल आणि व्हीएनडब्ल्यूसी यांनी आयोजित केला होता.
















