मिसिंग लिंक वरील दरड कोसळणे आणि रस्त्याचा दर्जा यासाठी जबाबदार कोण ? MSRDC संचालक अनिल गायकवाड यांची हकालपट्टी करा -आम आदमी पार्टी

पुणे, दि. ६ जुलै : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्याजवळ आज पहाटे मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून सुमारे १०० टन मलबा रस्त्यावर आल्याच्या घटनेनंतर आम आदमी पार्टीने या प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या घटनेची जबाबदारी निश्चित करून MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना तात्काळ पदावरून हटविण्याची मागणी पक्षाने केली आहे.

पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वेगाने धावणाऱ्या वाहनांवर दरड कोसळली असती तर मोठी जीवितहानी झाली असती, असेही त्यांनी नमूद केले.

बोगद्याजवळील रिटेनिंग वॉल कोसळण्यामागील कारण, डोंगराच्या स्लोप स्टॅबिलिटीची तपासणी झाली होती का, सुरक्षा भिंत अपेक्षित दर्जाची होती का, तसेच डोंगरभागाच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक अभियांत्रिकी निकषांचे पालन झाले होते का, याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे.

याशिवाय, काही दिवसांपूर्वी नव्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचाही उल्लेख करत या संपूर्ण प्रकल्पात दर्जाहीन काम अथवा आर्थिक अनियमितता झाली आहे का, याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारने या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया देण्याऐवजी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, दोषींवर कारवाई करावी आणि मिसिंग लिंक प्रकल्पाची संपूर्ण सुरक्षा व गुणवत्ता तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

See also  औंध वार्ड ऑफिसच्या मोहल्ला कमिटी मिटिंगमध्ये नागरिकांनी मांडल्या समस्या