नवी दिल्ली : विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी सरकारवर विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचारांची जबाबदारी टाळण्याचा आरोप केला.
आंदोलनादरम्यान नेत्यांनी आरोप केला की, “काल तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईबाबत सरकार कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. तसेच या गंभीर विषयावर संसदेत चर्चा घेण्यासही सरकार टाळाटाळ करत आहे.”
यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील युवकांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. घोषणाबाजी करत आंदोलकांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान निवास परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही ठिकाणी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अडवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणावर संसदेत आणि राजकीय पातळीवर पुढील काही दिवसांत जोरदार संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














