पुण्यात CJP च्या विद्यार्थी पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; भर पावसात हजारो नागरिक रस्त्यावर

पुणे : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि NEET पेपरफुटी तसेच विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाच्या निषेधार्थ आज पुण्यात CJP (कॉकरोच जनता पार्टी) च्या वतीने विराट विद्यार्थी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. भर पावसातही पुणे शहरातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोलनात महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

लाल महाल येथून सुरू झालेली ही शांततापूर्ण पदयात्रा फडके हौद, दारूवाला पूल, नर्पतगिरी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, NEETसह सर्व पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.

मुसळधार पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी मोठ्या शिस्तीने आणि शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला. “शिक्षण वाचवा – विद्यार्थी वाचवा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलकांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीचा हा लढा केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठीचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा संघर्ष पुढेही सुरू राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

See also  औंध परिहार चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन