अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

पुणे : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान पाहता यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्राच्या विकासात गेली चार दशके अजित पवार यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. आमदार, खासदार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याबरोबरच अजित पवार यांनी अर्थ व नियोजन, जलसंधारण, ऊर्जा, ग्रामीण विकास, कृषी आदी अनेक महत्वपूर्ण विभागात अमूल्य योगदान दिले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही अनेक लोककल्याणकारी उपक्रम व प्रकल्प राबवले गेले आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे कायमच ते चर्चेत राहिले. याच कारणास्तव त्यांना जनतेचे प्रचंड प्रेम मिळाले. त्यांचे योगदान येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे.

अजित पवार यांचे कार्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे. केंद्र सरकारने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरील भेटीदरम्यान केली आहे. या मागणीचे निवेदनही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांना दिले आहे. अजित पवार यांचे यावर्षी जानेवारी महिन्यात विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या निधनाने हळहळला होता. कामाचा माणूस आणि रोखठोक नेता म्हणून अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख होती.

See also  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या डेक्कन येथील स्मारकाचे नूतनीकरण भूमिपूजन समारंभ संपन्न