पुण्यात 15-20 हजार दुचाकी रस्त्यावर आणून कसली राष्ट्रभक्ती? भाजपच्या तिरंगा रॅलीवर अमोल बालवडकरांचा हल्लाबोल

पुणे : भारतीय जनता पक्षाने पुण्यात आयोजित केलेल्या भव्य दुचाकी तिरंगा रॅलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी जोरदार टीका केली आहे.

पुणे शहरात आधीच वाहतूक कोंडीची भीषण समस्या आहे. जगातील सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्ये पुणे ५ व्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्याला ५० ते १०० दुचाकी आणण्याचे टार्गेट देऊन १५ ते २० हजार गाड्या रस्त्यावर उतरवणे म्हणजे पुणेकरांचा बळी देण्यासारखे आहे, असा घणाघात बालवडकर यांनी केला. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या या उपक्रमावर निशाणा साधला.

बालवडकर म्हणाले, “एकाच वेळी हजारो गाड्या रस्त्यावर आल्याने प्रचंड ट्रॅफिक जॅम, ध्वनी व वायू प्रदूषण आणि इंधनाचा अपव्यय होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंधन बचतीचे आवाहन करत असताना स्थानिक भाजप नेते प्रदूषण वाढवत आहेत. या रॅलीमुळे रुग्णवाहिका, रुग्ण, महिला आणि नोकरदार वर्गाला मनस्ताप सहन करावा लागेल.”

केवळ वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी सामान्य पुणेकरांना वेठीस धरू नका. खरी राष्ट्रभक्ती दाखवायची असेल तर रॅली ऐवजी वृक्षारोपण करा, खड्डे बुजवा, रक्तदान आणि स्वच्छता अभियान राबवा, असा सल्लाही त्यांनी दिला.हा नियोजनशून्य हट्ट सोडला नाही तर पुणेकरच भाजपला जाब विचारतील, असा इशाराही अमोल बालवडकर यांनी दिला आहे.

See also  फुले कृषी व सावित्री जत्रा २०२५ चे उद्घाटन संपन्न