पुणे : गणेशोत्सव संपून दोन आठवडे उलटले तरी उत्सवकाळातील ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी, ध्वनितीव्रतेच्या नोंदी आणि संबंधित मंडळांवरील कारवाईचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. याच्या निषेधार्थ लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या वतीने रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. पोलीस, पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबतचा सविस्तर अहवाल तातडीने जाहीर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
‘दोन आठवडे झाले पार, अहवाल द्या सरकार’, ‘तक्रारी झाल्या हजार, कारवाईचा कुठे समाचार?’ आणि ‘पोलीस, पालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जवाब दो!’ अशा घोषणांद्वारे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
गणेश विसर्जन मिरवणूक २६ सप्टेंबर रोजी संपल्यानंतरही ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी, नोंदी आणि दाखल गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही, असा आरोप मंचाने केला. राष्ट्रीय हरित लवाद आणि मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा दावाही आंदोलकांनी केला.
ध्वनिप्रदूषणाची तीव्रता मोजण्याची यंत्रणा, मंडळांनी परवाने प्रदर्शित करण्याची अट, ध्वनिवर्धक साहित्य जप्त करण्याची कारवाई आणि निर्धारित मुदतीत अहवाल जाहीर करणे, अशा विविध बाबींची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मंचाने स्पष्ट केले. प्रत्येक मंडळासमोरील ध्वनितीव्रतेची नोंद २४ तासांत प्रदर्शित करणे आणि सात दिवसांच्या आत संबंधित अहवाल जाहीर करणे, अशा निर्देशांचे पालन झाले का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
नवरात्र, दिवाळीत नियमांची कडक अंमलबजावणी करा
गणेशोत्सवानंतर आता नवरात्र, दिवाळी तसेच विविध धर्मांचे सण आणि महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथींचे कार्यक्रम होणार आहेत. या काळात पुन्हा ध्वनीप्रदूषणाचे प्रकार घडू नयेत, यासाठी न्यायालयीन आदेश आणि ध्वनीप्रदूषणविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. नागरिकांच्या सूचना मागवून स्पष्ट नियमावली तातडीने जाहीर करावी, अशी मागणी मुकुंद किर्दत यांनी केली.
यावेळी मुकुंद किर्दत, चिंतामणी कांगो, अशोक मेहंदळे, डॉ. सिमी आठवले, आशिष गुंजाळ, श्रीकांत भिसे, डॉ. राहुल सावंत, नीता केळकर, राजश्री गावडे, शीला परळीकर, गिरिजा गोडबोले, शुभदा जोशी, ज्योती जाधव, अनुजा जोशी, हेमंत गोळे, पूनम माजगावकर, शंकर थोरात, अनंत झानपुरे, बापूसाहेब शिरोळे, वैदेही कुलकर्णी, चेतन पटवर्धन, अपर्णा आठवले, महादेव कराडकर, विवेक काशीकर, सुनील क्षिरसागर, अंकुश पाटील, रामचंद्र पराष्टेकर, श्रीनिवास गडकरी, अवधूत धर्मेंद्र, शुभदा सावुजी, मनीष गडे, कौस्तुभ ठकार, संजय खांदोडे, माधुरी दाबक, विवेक सरपोतदार, राजीव आगाशे, सुवर्णा जोशी, सुहास क्षीरसागर, अनिता पाटकर, अशोक अळवणी, माणिकचंद बाहेती, श्रीधर घाणेकर, समर्थ सावंत, प्रशांत कुलकर्णी, विनायक बेलापूरे, रामचंद्र कुलकर्णी यांच्यासह मंचाचे अन्य सदस्य उपस्थित होते.
















