जयराम गृह रचना सोसायटीच्या एसआरए योजनेची सखोल चौकशी करा; रहिवाशांची मागणी; मूळ आराखडा, करारनामे, पात्र लाभार्थी, सदनिका आणि मूलभूत सुविधांच्या तपासणीसाठी एसआरए प्रमुखांना निवेदन

कोथरूड : जयराम गृह रचना सहकारी संस्था, इंदिरा पार्क आणि वसंत नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विविध बाबींची निष्पक्ष व सखोल चौकशी करून रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात रहिवाशांच्या वतीने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे प्रमुख आयुक्त खडके साहेब यांना तक्रार व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या पुनर्वसन योजनेतील मूळ आराखडा, सुधारित आराखडा, जुने व नवीन करारनामे, पात्र लाभार्थ्यांची संख्या, सदनिका व व्यावसायिक गाळ्यांचे वाटप तसेच पार्किंग आणि इतर मूलभूत सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सन १९९५ मधील मूळ आराखडा, सन १९९६ मधील करार आणि सन २०२४ मधील सुधारित आराखडा यांची तुलनात्मक तपासणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच, आराखड्यातील बदलांना अधिकृत मंजुरी मिळाली आहे का, रहिवाशांची संमती नियमानुसार घेण्यात आली होती का आणि मंजूर एफएसआय व टीडीआरचा वापर नियमांनुसार झाला आहे का, याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

योजनेतील उद्यान, व्यायामशाळा, सामायिक जागा, पार्किंग आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची तांत्रिक तपासणी करून आवश्यक असल्यास संबंधित विभागांचे अहवाल मागवावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्ती, संस्था किंवा विकासकाविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी आणि चौकशीचा निष्कर्ष लेखी स्वरूपात कळवावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

या वेळी हे निवेदन देताना ज्येष्ठ नागरिक माऊली काळोखे, राहुल वांजळे, विठ्ठल पासलकर, मनोहर धनावडे, संतोष सातपुते, सचिन यादव, निकुंज उभे, धनंजय गोळे, स्वप्नील भोसले, गणेश सोनार आणि प्रफुल्ल शिंदे उपस्थित होते.

पुनर्वसन प्रक्रियेत पात्र रहिवाशांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, तसेच संपूर्ण योजनेतील कागदपत्रे आणि तांत्रिक बाबींची पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, ही प्रमुख मागणी रहिवाशांनी केली आहे.

See also  पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट 34 गावांच्या प्रतिनिधींची आयुक्तांसोबत बैठक; नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा