हडपसर : स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल, ८३ बी इंग्रजी , डी. पी. रोड, माळवाडी, हडपसर येथे भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांची ज्ञानसंपदा वाढावी आणि वाचनातून विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध वाचनविषयक उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके, गोष्टींची पुस्तके, चरित्रे तसेच ज्ञानवर्धक साहित्याचे वाचन केले. काही विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधील आवडलेल्या गोष्टी आणि प्रेरणादायी विचार वर्गासमोर मांडले.
यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. मोबाईलच्या वाढत्या वापराच्या काळात पुस्तकांशी मैत्री करणे, दररोज काही वेळ वाचनासाठी देणे आणि वाचनातून मिळणारे ज्ञान आपल्या जीवनात उपयोगात आणणे आवश्यक असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनायक पुणेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “दररोज पुस्तक वाचण्याची सवय लावावी आणि वाचनाला आपल्या जीवनाचा भाग बनवावे,” असे आवाहन केले. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला अस्मिता मॅडम, कृष्णाली मॅडम, गावडे सर, सलमा मॅडम, वंदना मॅडम, अनुराधा मॅडम, नांदगुडे मॅडम, विद्या मॅडम, उमा मॅडम, शर्मिला मॅडम, जाधव मावशी, जगताप मावशी, चव्हाण मावशी, मयुरी दीदी, अदिती दीदी, वैभवी दीदी, कृष्णा भैया, ऋतुराज भैया, बडदे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वर्गशिक्षक अक्षयकुमार कांबळे सर यांनी केले. शिक्षकवृंदाच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. “वाचाल तर वाचाल, वाचनातून घडेल उज्ज्वल भविष्य!” हा संदेश अक्षयकुमार सरांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी प्रेम, ज्ञानाची जिज्ञासा आणि नियमित वाचनाची प्रेरणा निर्माण झाली.
वाचनातून ज्ञान, ज्ञानातून प्रगती आणि प्रगतीतून उज्ज्वल भविष्य! या प्रेरणादायी विचाराने शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
















