पुण्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव; बाणेर येथील डॉक्टर नायडू रुग्णालयाला भेट देत आयुक्तांकडून उपाययोजनांचा आढावा

पुणे, दि. २४ ऑक्टोबर : पुणे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी बाणेर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ. नायडू संसर्गजन्य आजार रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. डेंग्यूच्या रुग्णांवरील उपचार, रुग्णालयांतील खाटांची उपलब्धता आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. नागरिकांनी घाबरून न जाता डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन आयुक्तांनी केले.

महापालिकेच्या माहितीनुसार, पुणे शहरात २०२४ मध्ये डेंग्यूच्या ४,९०८ रुग्णांची, तर २०२५ मध्ये २,३९१ रुग्णांची नोंद झाली. जानेवारी २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत २,२९१ रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.

शहरात ४,७४२ खाटा उपलब्ध
डेंग्यूच्या उपचारांसाठी शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये ४,४०९ खाटा, तर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ३३३ खाटा उपलब्ध आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयांतील ६७० आणि महापालिका रुग्णालयांतील सहा अतिदक्षता विभागातील खाटांचा समावेश आहे. डॉ. नायडू रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी ३५ खाटा रिक्त आहेत. या रुग्णालयातील उपचार पूर्णपणे मोफत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेच्या पथकांनी सुमारे १४ लाख घरांना भेटी देऊन २८ लाख ३१ हजार ३८६ पाण्याची भांडी व साठ्यांची तपासणी केली. यामध्ये सुमारे १३ हजार घरांतील १८ हजार ८८५ कंटेनरमध्ये एडीस डासांच्या अळ्या आढळल्या. या प्रकरणी २,६६४ मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या असून, सहा लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वातावरणातील बदल, वाढती बांधकामे, पाणी कपातीमुळे साठवले जाणारे पाणी तसेच घरातील कुंड्या, ताटल्या आणि टेरेस गार्डनमध्ये साचणारे पाणी यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेने नोंदवले आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह बांधकाम, अतिक्रमण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाने समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

See also  इन्स्टिट्यूट फॉर रिरायटिंग इंडियन हिस्टरी तर्फे पु. ना. ओक स्मृति व्याख्यानमालेत श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान

डेंग्यूचे रुग्ण अधिक आढळणाऱ्या भागांमध्ये औषध फवारणी आणि प्रतिबंधात्मक कारवायांना प्राधान्य दिले जाणार आहे. पाणी साठवलेल्या ठिकाणी जैविक अळीनाशकांचा वापर करण्यासह डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच, डेंग्यूच्या रुग्णांची माहिती खासगी आणि सरकारी रुग्णालयांनी आयएचआयपी (IHIP) पोर्टलवर नोंदवावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

डेंग्यू प्रतिबंधासाठी रेल्वे स्थानकांवरील डिजिटल फलक, रेडिओ आणि कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांद्वारे जनजागृती केली जात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनी गच्ची, पाण्याच्या टाक्या आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमध्येही जागृती केली जात आहे.

नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, पाण्याची भांडी व टाक्या झाकून ठेवाव्यात आणि घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये. डेंग्यूची लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार करावेत, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.