पुण्यात महिला असुरक्षित; भिडेवाडा स्मारकाबाबत सरकारची अनास्था – सतेज पाटील

पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आज पुण्यात दहा ते बारा लाख विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत, तर १२ ते १५ लाख महिला रोजगारासाठी घराबाहेर पडतात. मात्र, शहरातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेमुळे महिलांना रस्त्यावरून जाताना सुरक्षित वाटत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, भिडेवाडा स्मारकाच्या पुनर्विकासाबाबत राज्य सरकार आणि पुणे महापालिकेची अनास्था दिसून येत आहे. केवळ समाजसुधारकांचे नाव घेण्यापेक्षा त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत रुजविण्याची गरज आहे, अशी टीका माजी मंत्री आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी शुक्रवारी केली.

सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला पुणे शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा फुले पेठेत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी महात्मा फुले वाड्यात जाऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे विशेष व्याख्यान झाले. विविध शाळांचे प्राचार्य आणि शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

सतेज पाटील म्हणाले, काँग्रेसने महिला प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सर्वप्रथम डिलिमिटेशन विधेयक आणून प्रयत्न केले. मात्र, भाजप सरकार या विधेयकाच्या माध्यमातून मतदारसंघांची चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना करीत आहे. केंद्र सरकारकडून संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. समाजात जाणीवपूर्वक भांडणे लावली जात असून, त्याला शासनस्तरावरूनही पाठबळ मिळत-असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत. ही विसंगती लक्षात घेतली पाहिजे.

फुले दाम्पत्याने प्रतिकूल परिस्थितीत सत्याची बाजू घेत समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडवले. त्यांचे विचार पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. पुणे महापालिकेने फुले पुरस्कार बंद केले असतील, तर पुणे शहर काँग्रेसने पुढील वर्षापासून हे पुरस्कार सुरू करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

See also  योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार

माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, फुले दाम्पत्याने प्रचंड अवहेलना सहन करून शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात क्रांतिकारी काम केले. शिक्षणाच्या माध्यमातून उपेक्षित समाजही प्रगती करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. मात्र, आज सत्ताधारी फुले आणि आंबेडकरांचे विचार बाजूला सारण्याचे काम करीत आहेत. लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन आगामी काळात मोठी वैचारिक लढाई उभारावी लागेल.

ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी फुले यांच्या कार्याचा वेध घेताना सांस्कृतिक राजकारणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, फुले दाम्पत्याने पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना शेणाचे गोळे झेलावे लागले. आज त्यांचेच नाव विद्यापीठाला द्यावे लागले, ही त्यांच्या कार्याची ताकद आहे. फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते उत्तम उद्योजक, अभ्यासक आणि राजकारणीही होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यांच्यावर पोवाडाही लिहिला. फुले ब्राह्मणविरोधी होते, असा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. त्यांच्या विचारांचा योग्य अर्थ समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. भाजपच्या धार्मिक उन्मादाला आणि जातीय विखाराला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने आपली वैचारिक आणि सांस्कृतिक भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली पाहिजे.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी मोठा संघर्ष केला. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी काँग्रेस सरकारने पुढाकार घेतला होता. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्यात वैचारिक मतभेद असतानाही टिळकांवर खटला सुरू झाला, तेव्हा फुले यांनी त्यांच्या बाजूने खटला लढण्यासाठी आर्थिक मदत उभी केली होती. मतभेद असले तरी विरोधकांना शत्रू समजण्याची प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे, असे ते म्हणाले.

आबेदा इनामदार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर अधिक चर्चा होण्याची गरज व्यक्त केली. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी १७५ वर्षांपूर्वी संघर्ष केला. आजही मुलींच्या शिक्षणासाठी जागृती आणि पाठबळ आवश्यक आहे. कौशल्य शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कारही रुजवले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

See also  "सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर १०० कोटी द्यावे लागेल" -अनिल परब

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओ.बी.सी. विभागाचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांनी सत्यशोधक विचारधारेचे महत्त्व सांगताना फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता कृतीत आणण्याचे आवाहन केले. सत्ताधारी मनुवादी विचार रुजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुणे शहर कॉंग्रेस पश्चिम विभाग अध्यक्ष दीप्ती चवधरी यांनी फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याची मागणी केली. भिडेवाडा स्मारकाचे काम आगामी तीन वर्षांत मार्गी लागले नाही, तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पुणे शहर कॉंग्रेस पूर्व विभाग अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महापालिकेने विशेष कार्यक्रम आयोजित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महापालिकेचे १६ हजार कोटींचे बजेट असतानाही फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याची-टीका त्यांनी केली. २०१७ पासून भाजपने महात्मा फुले यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार बंद केल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, उल्हास पवार, अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रफीक शेख, सुनील शिंदे, साहिल केदारी, सायरा शेख, काशिफ सय्यद, अमीर शेख, अजित दरेकर, स्वाती शिंदे, विरेंद्र किराड, सौरभ अमराळे, बाळासाहेब अमराळे, चंद्रशेखर कपोते, राजाभाऊ कदम, सुरेश चौधरी, कैलास गायकवाड, रमेश अय्यर, नुरूद्दीन सोमजी,  द. स. पोळेकर, राहुल वंजारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश बागवे यांनी केले.