राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय समन्वय बैठक दि.14-16 सप्टेंबर रोजी पुण्यात

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक या वर्षी महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. तीन दिवसांची ही समन्वय बैठक 14-15-16 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. अखिल भारतीय पातळीवरची ही व्यापक समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित होते.

शि. प्र. मंडळीच्या स.प. महाविद्यालय परिसरात ही बैठक होणार आहे. या बैठकीत पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, माननीय सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह रा.स्व. संघाचे सर्व पाच सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. बैठकीत संघप्रेरित 36 विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील.

यामध्ये प्रामुख्याने राष्ट्र सेविका समिति, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटना बैठकीत सहभागी होतील. या सर्व संघटना आणि त्यांच्याशी संबंधित पदाधिकारी समाज जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये सेवा, समर्पण आणि राष्ट्र भावनेने सक्रिय असतात. गेल्या वर्षी ही बैठक छत्तीसगडमधील रायपुर येथे आयोजित केली होती.
या बैठकीत सहभागी होणाऱ्या सर्व संघटना समाजजीवनातील विविध पैलूंबाबत त्यांचे अनुभव व कार्य याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीसोबतच सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सेवा कार्य, सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा या विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार आहे. सामाजिक परिवर्तनाच्या विविध क्षेत्रांमध्ये करावयाच्या कार्यांबाबतही यावेळी चर्चा केली जाईल.

See also  इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास