सोमेश्वरवाडी : सोमेश्वरवाडी भागातील गावठाण व स नं-१२/१२ मधील रहिवाशी वस्तीमध्ये दीड ते दोन महिने झाले रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने केला जात आहे तर काही भागात येतच नाहीये खासकरून गावठाण भागात. त्यामुळे या परिसरातील नागरिक पिण्याचे पाणी आणण्यासाठी एक ते दीड किलोमीटर पायपीट करत आहे. तर काही लोक प्रायव्हेट टँकरचे पाणी रु १५००/- विकत घेऊन ते पाणी पिण्यासाठी वापरत आहे. या टँकरचे पाणी अशुद्ध असल्यामुळे या भागातील अनेक नागरिक आजारी पडत आहेत.
तसेच याभागात पिण्याच्या पाण्यासाठी जे मिटर बसवलेत त्यात मोठ्याप्रमाणात काळाबाजार होत आहे. या परिसरातील नागरिकांनी स्थानिक प्रतिनिधींना व आपल्या कार्यालयात येऊन व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून वेळोवेळी तक्रारी दिल्या परंतु आपल्या प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही तरी या सर्व प्रकाराला कंटाळून सदरच्या परिसरातील नागरिकांनी आमच्या कार्यालयात येऊन तक्रार केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमेश्वरवाडी भागात पाण्याची समस्या असणाऱ्या नागरिकांसाठी आम्ही सह्यांची मोहीम राबविली त्यात अनेक नागरिकांनी आपले योगदान दिले आहे. सोमेश्वरवाडी भागात नियमित पाणी पुरवठा करावा व ज्या भागात पाणी पोहचत नाही त्या भागात विशेष लक्ष घालून पाणी पोहोचवण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली.
जर येत्या ८ दिवस सदरच्या परिसरातील परिस्थिती पूर्ववत नाही झाली तर आम्ही मनसे तर्फे आपल्या कार्यालयावर स्थानिक नागरिक व महिलांना घेऊन हंडा मोर्चा आणला जाईल अशाप्रकारचे निवेदन चतृशृंगी पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण उपविभागाध्यक्ष पांडुरंग सुतार, सचिव संदीप काळे, शिवम दळवी, किरण काकडे, शाम शिंदे, गणेश साळी व मनसैनिक उपस्थित होते.