पुणे, दि.१०: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला भेट देऊन ईव्हीएम सुरक्षिततेचा आढावा घेतला.
यावेळी पोलीस सहआयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या अपर जिल्हाधिकारी रुपाली आवळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उप विभागीय अधिकारी संजय आसवले, स्नेहा किसवे-देवकाते, पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले, मधुसदन बर्गे आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीचे महत्व लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणेने समन्वयाने काम करावे. ‘ईव्हीएम’बाबत भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मानकांचे तंतोतंत पालन करावे. मानके मराठी भाषेत तयार करुन सर्व संबंधितांना देण्यात यावीत. ईव्हीएम सुरक्षिततेच्या अनुषंगाने महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त प्रशिक्षण आयोजित करावे.
गोदामाला भेट देणाऱ्या प्रत्येकाची नोंदवहीत नोंद घ्यावी. येथील सुरक्षा रक्षकाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन घ्यावात. आवश्यकतेनुसार सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी. गोदामाच्या सुरक्षितेच्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
यावेळी डॉ. दिवसे यांनी सीसीटीव्ही, वीज, आगप्रतिबंधात्मक उपाययोजना, विविध प्रकारच्या नोंदवह्या आदी बाबत माहिती घेतली.
मतदान केंद्राची पाहणी
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज हायस्कूल आणि साधू वासवानी चौक येथील सेंट मीरा गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्राची पाहणी केली.
घर ताज्या बातम्या जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कोरेगाव पार्क येथील ईव्हीएम सुरक्षिततेचा घेतला आढावा