राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर “तुतारी” पक्ष चिन्हाचे अनावरण

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रायगड किल्ल्यावर पक्षाचे चिन्ह अनावरण करण्यात आले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या “तुतारी” चिन्हाचे अनावरण खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

खासदार शरद पवार म्हणाले, आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील असा आहे. देशामध्ये गंभीर स्थिती आहे, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, सर्वसामान्य माणसाला कुटुंब चालवायला महागाईच्या संकटाने जवळपास अशक्य करून ठेवलं आहे. हातामध्ये असलेली सत्ता ही सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी वापरण्याऐवजी राज्याराज्यांमध्ये व आणखी भागांमध्ये, भाषांमध्ये या सर्वांत अडचण माजवण्याच्या संबंधीची काळजी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्याच्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे.

हा एक वैचारिक धोरणांचा संघर्ष आहे. ज्यावेळेला आपल्याला संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवायला मदत करणारा हवा असतो. शिवछत्रपती यांचे आपण आजही स्मरण का करतो? तो सबंध कालखंडच तसा होता, परकियांच्या हातात सत्ता होती. सामान्य माणसांत आत्मविश्वास वाढवण्याची कामगिरी शिवछत्रपतींनी त्या काळात केली व त्यामधूनच हे राज्य उभे राहिले. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, संस्थाने झाले. पण त्यांची जी ओळख होती ती वेगळ्या पद्धतीने होती. शिवछत्रपतींचे राज्य हे सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. हे रयतेचे राज्य व हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेसाठी जनशक्ती उभी करण्याचे काम शिवछत्रपतींनी केले.

महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी कष्ट करावे लागण्याचा हा कालखंड आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या नावाने ही संघटना आपण सर्वांनी उभी केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगाने आपल्याला आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी एक रणशिंग फुंकलेलं आहे व तुतारी दिलेली आहे. ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून ही यश मालिका या ठिकाणी मिळेल. हे यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आनंदाची तुतारीची रणशिंग फुंकण्याची स्थिती या राज्यात लवकरच तुमच्या कष्टाने, प्रयत्नाने आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे.

See also  शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलमध्ये कॅमेरा प्रणालीचे उद्घाटन

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, “आजपासून पवार साहेबांनी हे रणशिंग फुंकलेलं आहे. येणा-या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सगळ्या महाराष्ट्राने साथ द्या. महाराष्ट्रातील रयतेची साथ पवार साहेबांच्या मागे उभी राहिल हा विश्वास आहे!”

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतक-यांचा-महिलांचा-ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या
माझ्या महाराष्ट्राचा यासाठी प्रयत्न करु”

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून या चिन्हाचं अनावरण रायगडाच्या त्या पवित्र भूमीत झालंय. ज्या पवित्र भूमीतून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ग्वाही ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपानं जगभर पसरली होती. ”यावेळी पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित होते.