स्त्री पुरुष समानता देशाच्या प्रगतीची गरज

प्रा. भास्कर घोडके
खरतर 8 मार्च 1917 रोजी कामगार स्रियांनी स्वतःच्या रोजी रोटीची जी हाक दिली तिला आज 113 वर्ष पूर्ण होत आहेत ‘ब्रेड आणि फ्रीडम’ साठी त्यावेळी रस्त्यावर उतरून केलेलं आवाहन त्यावेळी लक्षवेधी ठरलं होतं .’ब्रेड आणि फ्रीडम ‘  हे ब्रीद घेऊन सुरू झालेल्या या लढ्याला पुढे युनोने  कार्यालयीन मान्यता दिली आणि तेथपासून पुढे महिलांना समानतेचे प्रतीक म्हणूनच हा दिवस  विश्वभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा होताना दिसतो आहे .परंतु आजच्या महिला दिनाचे स्वरूप हे बाजारीकरनाचं झालं असून महिलांची समाजमाध्यमातून वस्तू म्हणून विक्री होताना दिसतेय आणि एकूणच समाज म्हणून आपण सारे महिला दिनाचे भान कमी समजावून घेताना दिसतो आहोत ही आजची खरी खंत आहे .


आजच्या काळामध्ये महिला दिनाला बैलपोळ्यासारखं रूप आलं असून महिला दिनाच्या दिवशीच फक्त बैलासारख्या रात्र-दिवस  श्रमणाऱ्या बायकांचा सन्मान केला जातो . इतर 364 दिवसांमध्ये त्यांना मारहाण,बलात्कार,उपेक्षा ,दुय्यम वागणूक सोसावी लागतेय .महिला दिन साजरा होताना स्त्रियांचे तत्कालीन मुद्दे, प्रश्न आणि त्याचं अवलोकन याचा विचारविनिमय आजच्या दिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने व्हायला हवा.
आज पुरुषांची मक्तेदारी असलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी मोठ्या आत्मविश्वसने भरारी घेतली आहे.खरं तर निसर्गतः स्त्रिया ह्या अबला नाहीत परंतु जातीयवादी भूमिकेमुळे आणि सतत दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे स्त्रिया ह्या अबला बनवल्या गेल्या आहेत.
आजही आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये स्त्रियांची संख्या ही पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे .आज समाजामध्ये पाहिलं तर स्त्रियांनी त्यांच्या सर्व क्षमता सिद्ध केल्याचं आपणाला दिसून येत आहे तसेच प्राथमिक शिक्षणामध्ये मुलींचं  प्रमाण जास्त व उच्च शिक्षणामध्ये घटत जात आहे आणि ही फार मोठी चिंतेची बाब आहे .1995 मध्ये बीजिंग येथे ‘इच फॉर  इक्वल ‘ हे सूत्र घेऊन भरलेल्या जागतिक परिषदेमध्ये आरोग्य,शिक्षण,स्त्री-पुरुष वेतन फरक ,स्त्रियांच्या राजकीयसहभाग आदींबाबत विचार केला असता भारताचा शेवटून दहावा व एकूण सर्व जगातील देशांमध्ये 120 वा क्रमांक असल्याची वास्तविकता आपल्याला स्वीकारावी लागते आहे आणि हे सगळं होण्यामागे या देशातील मागच्या 2000 वर्ष पोसलेल्या व्यवस्थेनं स्त्रियांना पंगू करून टाकल्याचे आपल्याला स्वीकारावं  लागेल.
आज देशामध्ये 1996 पासून महिला आरक्षण रखडत पडल्याचं कारण देखील इथली व्यवस्थाच आहे आणि म्हणूनच आज लोकसभेमध्ये फक्त 14 टक्के स्त्रियाच देशातील महिलांचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतात .आज स्त्रियांवर होणारे अत्याचार अतिशय गंभीर आहेत आणि वेळोवेळी आपल्या समाजामध्ये  रिंकू पाटील आणि हिंगनगघाटातील प्रकरने घडत आहेत.

See also  वरून चमकणारे कोथरूड आतून पोखरलेले : विजय डाकले


आज स्त्रियांची समानता फक्त कागदावरच आहे .स्त्री-पुरुष समानतेचे सूत्र पुढे घेऊन जाताना त्याविषयीचे धोरण, अंमलबजावणी व्हायला हवी.एकीकडे कायदे होतात,धोरण ठरतात परंतु अमंलबजावणी होताना दिसत नाही आणि जे हे ठरवतात तेच आज राजकारणात महत्वाच्या जागांवर बसलेले आहेत आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींची,राजकीय इच्छाशक्तीची समाजाच्या पातळीवर चिकित्सा होणं गरजेचं आहे. आज समाजामध्ये रोटी व्यवहार होतो पण बेटी व्यवहार होताना दिसत नाही .पालक ‘ऑनर किलिंग’ सारख्या गोष्टी करताना दिसतात आणि म्हणूनच प्रतिष्ठेपायी केलेल्या हत्यांचाही आज गुन्ह्यांच्या नवीन सुचिमध्ये समावेश होताना दिसतोय.
राज्य घटना सर्व धर्मांचा आदर करायला शिकवते.कोण्या एका  धर्माचा आदर करावा असं  ती सांगत नाही.आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था आणि धर्म व्यवस्था रुतून बसली आहे.त्यामुळेच प्रत्येक धर्मामध्ये स्त्रियांना अमानुषपणे वागणूक दिली जाते.स्त्रियांना इथल्या पुरुषप्रधान  व्यवस्थेने कायम “मम्” म्हणायला लावलं आणि त्यातूनच ही मम् ची मानसिकता पुढे जात राहिली आणि आजही ही ती आपल्या समाजामध्ये रुतून आहे .
डॉ.आंबेडकरांनी देखील जाती व्यवस्था हीच येथील विषमतेचं मूळ असल्याचं म्हंटल होत.पुरुषप्रधान संस्कृतीने शेकडो वर्षांपासून योनी शुचितेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आणि मनूच्या संहितेमध्ये देखील स्त्रियांना याच गोष्टीवरुन कठिण शिक्षा केल्याचं दिसतं  आहे.
आजही मराठी भाषेमध्ये म्हणी बघितल्या तर त्यामधून स्त्रियांची मानहानी होताना दिसतेय.तिला हीन समजलं जातं आहे .
भारताच्या संपूर्ण सामाजसुधारनेच्या चळवळीचं नेतृत्व पुरुषांनी केलं आहे पण प्रत्येक घरामध्ये सावित्री जर आपल्याला हवी असेल तर प्रत्येक घरामध्ये ज्योतिबाही असायला हवा आहे. ज्या देशामध्ये  स्त्री- पुरुष समानता आहे त्याच देशांनी आज प्रगती केल्याचं आपणाला दिसत आहे.पुरुषांनी आपला पुरुषी अहंम बाजूला ठेवून स्त्री समानतेच्या दृष्टीनं पाऊल  टाकायला हवं. आजच्या दिवशी स्त्री- पुरुष समानतेच्या दिशेने आणखी एक पाऊल आपण टाकूयात तरच आजचा दिवस साजरा केल्याचं सार्थक होईल.