सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांचा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त उपक्रम
पॅरीस २०२४ मधील महाराष्ट्राच्या ऑलिंम्पिक वीरांचा
३१ ऑगस्ट रोजी पुणेकरांच्या वतीने होणार भव्य नागरी सत्कार

पुणे : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचवणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा पुणेकर नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या वतीने शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे या समारंभाचे आयोजन केले आहे. भारताचे माजी हॉकी कर्णधार, पदमश्री, अर्जुन आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानीत मा. श्री धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एलीव्हेट एज कन्सल्टिंग ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पाटील व उद्योगपती पूनित बालन यांच्या हस्ते या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.
या समारंभाबाबत अधिक माहिती देताना सोमेश्वर फऊंडेशनचे अध्यक्ष मा. श्री सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की सत्कारमुर्ती खेळाडूंमध्ये पॅरिस ऑलिंपिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळे, पॅरिस ऑलिंपिक मध्ये सहभागी झालेले तिरंदाज प्रविण जाधव आणि अॅथलेटक्समधील खेळाडू सर्वेश कुशारे, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात कमी वयात सुवर्णपदकाला गवसनी घालणारी भारताची पहिली सुवर्णपदक विजेती सातारची महिला तिरंदाज अर्जुन पुरस्कार सन्मानीत आदिती स्वामी आणि तिरंदाजीमधीलच मुळचा नागपूरचा पण सध्या सातारा येथे प्रविण सावंत यांच्याकडे प्रशिक्षण घेत असलेला सुवर्णपदक विजेता अर्जुन पुरस्कार सन्मानीत ओजस देवतळे, जगज्जेता मल्लखांबपटू पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळाचा विश्व अजिक्यपद स्पर्धेत १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदके पटकावणारा  शुभंकर खवले यांचा समावेश आहे.
खेळाडूंच्या जडण घडणीमध्ये त्याच्या प्रशिक्षकाचा मोलाचा व महत्वाचा वाटा असतो याची जाणीव ठेवत प्रशिक्षकांनासुद्धा पुणेकरांच्यावतीने गौरविण्यात येणार असल्याचे क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले. स्वप्निल कुसळे याच्या प्रशिक्षीका माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती दिपाली देशपांडे, आदिती स्वामी आणि ओजस देवतळेचे प्रशिक्षक सातारचे प्रविण सावंत, मल्लखांबपट्टू शुभंकर खवळे याचे प्रशिक्षक अभिजीत भोसले यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे.
मराठी क्रीडा पत्रकारीतेमधील सुमारे ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा पत्रकारीता केलेल्या आणि पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने दखल घेतलेल्या मा. विनायक

..२..
दळवी, मा. सुहास जोशी आणि मा. शरद कद्रेकर यांचाही सन्मान यावेळी करण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमाचे सचिव आणि जेष्ठ क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
या उदयोन्मुख खेळाडूंचे कौतुक करण्यास या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार सन्मानीत सौ. स्मिता यादव-शिरोळे, अर्जुन पुरस्कार सन्मानीत श्रीमती शकुंतला खटावकर, मा. श्री. शांताराम जाधव, मा. श्री. श्रीरंग इनामदार आणि मा. श्री. काका पवार लाभले आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहर भाजपा अध्यक्ष मा. श्री. धीरज घाटे, शहर काँग्रेस अध्यक्ष मा. श्री. अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मा. श्री. दिपक मानकर, राष्ट्रवादी (शरद पवार) शहराध्यक्ष मा. श्री. प्रशांत जगताप, शिवसेना शहर प्रमुख मा. श्री. प्रमोद भानगिरे, शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख मा. श्री. गजानन थरकुडे, मनसे शहर प्रमुख मा. श्री. साईनाथ बाबर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहर प्रमुख मा. श्री. संजय मोरे, आम आदमी पार्टीचे शहरप्रमुख मा. श्री. सुदर्शन जगदाळे व मा. श्री. धनंजय बेनकर आणि वंचित बहुजन आघाडीचे शहरप्रमुख मा. अॅड. अरविंद तायडे आदी मान्यवर हजर राहणार आहेत.
या भव्य नागरी सत्कार समारंभासाठी सर्व पुणेकर नागरिकांनी उपस्थित राहून या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मुख्य संयोजक सोमेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण, क्रिडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव, गौरव समितीचे सचिव संदीप चव्हाण व एमओएचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र घुले यांनी केले आहे.
यावेळी सनी निम्हण म्हणाले की, देशाची मान उंचावणाऱ्या या खेळाडूचा पुणेकरांच्या वतीने हा सन्मान होत असून या कार्यक्रमाचे आयोजन करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले की, या खेळाडूंच्या कामगिरीत मोलाचा आणि महत्वाचा सहभाग असणाऱ्या त्यांच्या प्रशिक्षकांनाही यावेळी  सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
या ऑलिंपिकसह सर्व स्पर्धांचे उत्कृष्ट वार्तांकन करून लाखो नागरिकांपर्यंत या खेळाडूंची कामगिरी पोहोचविणाऱ्या आणि ज्यांची दखल आंतरराष्ट्रीय क्रीडापत्रकारांच्या संघटनेने घेतली अशा मराठी क्रीडा पत्रकारांनाही सन्मानित करणे तेवढेच महत्वाचे असल्याचे संदीप चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

See also  बालेवाडी ३० डिसेंबर रोजी येथे श्री अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन