पुणे शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या  धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या   चारही धरणांतील  पाणीसाठा १७.८२ टीएमसी म्हणजे  ६१.१२ टक्के  झाला असून खडकवासला धरण तुडुंब( १००%)  भरले

खडकवासला : पुणे शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या  धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या   चारही धरणांतील  पाणीसाठा १७.८२ टीएमसी म्हणजे  ६१.१२ टक्के  झाला असून खडकवासला धरण तुडुंब( १००%)  भरले आहे. गेल्या दहा दिवसापासून धरण साखळीतील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने बुधवारी पहाटे साडेतीन  वाजता खडकवासला धरण १०० टक्के भरल्यावर  धरणातून मुठा नदी पात्रात २००० क्‍युसेकने सुरू केलेला विसर्ग  सकाळी साडेसहा वाजता चार हजार ७०८करण्यात आला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नदीपात्रातून  सोडण्यात येणाऱ्या प्रवाहात वाढ करत सकाळी सात  वाजता धरणाचे अकराही दरवाजे उघडून विसर्ग नऊ हजार ४१६ क्युसेकला स्थिर  करण्यात आला. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेले दहा दिवस खडकवासला धरण  साखळीतील पानशेत,  वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा १८४३ क्युसेकने येवा सुरू असल्याने  पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. साखळीतील पाणीसाठा  खालावत गेला होता तरी पाऊस न झाल्याने जूनच्या शेवटच्या आठवड्यात पुणे शहरात पाणी कपात जाहीर  होण्याची शक्यता निर्माण झाली  होती त्यामुळे सर्वजण काळजीत होते. परंतु २ जुलै पासून सुरू झालेला पावसाने चार दिवसानंतर जोरदार बॅटींग केल्याने धरणातील पाणीसाठा टप्प्याटप्प्याने वाढत गेला. मंगळवारी सकाळी  ५४.७९ टक्के( १५.९७ टीएमसी )झाला .  तर खडकवासला धरण तुडब भरल्याने धरणाच्या दरवाज्यातून मुठा नदीच्या पात्रात पहाटे साडेतीन वाजता विसर्ग  सुरू करण्यात आला.  धरणाचा  मोरीचे चार  दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून 2000 क्युसेकने विसर्ग  सुरू केल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्र्वेता कुऱ्हाडे  यांनी सांगितले. रात्रभर चाललेल्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येवा वाढतच आहे त्यामुळे सकाळी साडेसहा वाजता  धरणाचे सर्व म्हणजे अकरा दरवाजे  अर्ध्या फुटानेने उघडून ४७०८ क्युसेक करण्यात आला. सकाळी सात वाजता सर्व  दरवाजे एक फुटाने उघडून प्रत्येक दरवाजातून ८५६ क्युसेक विसर्ग वाढवल्याने एकूण विसर्ग ९८१६ क्युसेक स्थिर करण्यात आला आहे. तथापि  खडकवासला धरणाची पाणी पातळी वेगाने वाढत असल्याने   नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्कालीन विभाग अलर्ट झाले आहेत. पोलिसांनी पाण्याखाली जाणारी ठिकाणे पोलिस बंदोबस्त ठेवला असून कोणतीही जीवित हानी होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

चौकट

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस आणि धरणातील पाणीसाठा पुढील प्रमाणे ( बुधवारी सकाळी सहा पर्यंत मागिल २४ तासातील) खडकवासला:   २८ मिमी, १.९१ टीएमसी ( ९६. ८७ टक्के); पानशेत: ८२ मिमी, ७.२५ टीएमसी (६८.१२ टक्के); वरसगाव: ८२ मिमी, ६.८५ टीएमसी (५३.४० टक्के); टेमघर: १७० मिमी, १.८० टीएमसी (४८.६२टक्के).

खडकवासला धरणाच्या दरवाज्यातून मुठा नदी पात्रात पाणी सोडल्यानंतर पाण्याखाली जाणार ठिकाणे
पाण्याचा प्रवाह क्युसेक मध्ये
त्यापुढे पाण्याखाली जाणारे ठिकाण

७००० क्युसेक  नांदेड ते शिवणे पूल पाण्याखाली जातो
१५००० क्युसेक   बाबा भिडे पूल पाण्याखाली जातो
२०००० क्युसेक  पूल बंद करण्याकरता
२५००० क्युसेक गरवारे कॉलेज मधील खिलारे वस्ती झोपडपट्टी
30000 क्युसेक  शितळादेवी मंदीर डेक्कन
३५००० क्युसेक अंगणवाडी पुलासमोरची वस्ती
४०००० महानगरपालिकेच्या समोरील पूल
४५००० होळकर पुलाजवळ भाग.

खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात संततधार  पाऊस सुरू असून धरणाच्या मोर्‍यांतून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे पाणी वाहते असून पर्यटकांनी आणि नागरिकांनी उत्साहाच्या भरात पाण्यात उतरून जीव धोक्यात घालू नये. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पोलिसांची संपर्क साधावा.
जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक,  उत्तम नगर पोलीस ठाणे

नदीपात्रातून सोडण्यात येणाऱ्या विसर्ग पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार  पुन्हा कमीजास्त करण्याची शक्यता आहे.  नागरीकांनी  नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
श्र्वेता कुऱ्हाडे,
कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

See also  वन विभागामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग आवश्यक – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार