गारटेक्स-टेक्स प्रोसेस इंडिया प्रदर्शनाचे वस्त्रोद्योग मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि.१ : वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून उद्योजकांना सर्व सोयीसुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. उद्योजकांनी वस्त्रोद्योगोला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

जिओ सेंटर येथे गारटेक्स-टेक्स प्रोसेस इंडिया प्रदर्शनाचे (Gartex-TexProcess India) उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, उपसचिव श्रीकृष्ण पवार, अमर अख्तर, शरद जैनपुरिया, सिमॉन-ली, हिमानी गुलाटी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, वस्त्रोद्योगासाठी नवीन धोरण राज्यात आणले आहे. या धोरणाच्या माध्यमातून 25 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित आणि 5 लाखांपर्यंत रोजगार निर्मितीचे लक्ष आहे.राज्यात वस्त्रोद्योग क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार शृंखला निर्माण होण्यासाठी शेतकरी, वस्त्रोद्योग घटक आणि रोजगार निर्मिती यावर अधिक भर देण्यात येणार आहे. देशातील दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे देशभरातील कापड क्लस्टर्सच्या व्यावसायिक मागण्यापूर्ण होतील.


वस्त्रोद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे, ज्याचा देशाच्या औद्योगिक उत्पादनापैकी एक पंचमांश वाटा आहे. वस्त्रोद्योग क्षेत्र हा शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. हा वाढणारा उद्योग जगातील सर्वात मोठ्या, सर्वात आकर्षक प्रकारच्या ऑटोमोबाईल्स, फॅब्रिक्स, पोशाख, होम टेक्सटाइल्स, होम फर्निशिंग आणि इतर कापड उत्पादनांचे उत्पादन करून लोकांना रोजगार देतो. आज, एकूण निर्यातीपैकी सुमारे 11 टक्के भारताच्या निर्यातीत वस्त्रोद्योग क्षेत्र हे सर्वात मोठे योगदान देणारे क्षेत्र आहे. “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” या संकल्पनेला शासन प्रोत्साहन देत आहे.स्थानिक ब्रँड्स, उत्पादन आणि पुरवठा साखळींना प्रोत्साहन देण्यावर भर आहे.स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि उत्पादकांना स्थानिक स्तरावर उद्योग उभारणे हे आमचे ध्येय आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रादेशिक उद्योजकांना व्यासपीठ मिळणार आहे. असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

****

See also  राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट- कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम