रावसाहेब दानवे भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नियुक्त झाल्यामुळे पुण्यातील निकटवर्ती माजी नगरसेवकांना विधानसभेची संधी मिळणार का?

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘विधानसभा निवडणूक २०२४ : व्यवस्थापन समिती’ची घोषणा केली असून यात अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर ‘ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क प्रमुख’ ही जबाबदारी देण्यात आली आहे.

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर विधानसभा निवडणूक 2024 च्या व्यवस्थापन समितीची अध्यक्षपदाची धुरा आल्यामुळे पुण्यातील कोथरूड मतदार संघातील उमेदवार बदलाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आले आहे.

माजी नगरसेवक अमोल बालवडकर व माजी नगरसेवक किरण दगडे हे पुण्यातील दोन्ही माजी नगरसेवक रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय मानले जातात. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूड विधानसभा मतदार संघावर भाजपा मधून दावा सांगितला असून या ठिकाणी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या आमदार आहेत.

मागील निवडणुकांमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बाहेरून आलेला उमेदवार असा प्रचार करण्यात आला होता परंतु पक्षीय संघटनेच्या जोरावर चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला होता.

कोथरूड मतदार संघावर प्रामुख्याने दावा सांगणारे माजी महापौर मुरलीधर मोहोळ व माजी आमदार मेधा कुलकर्णी हे दोघेही लोकसभा व राज्यसभेवर खासदार झाले आहेत. यामुळे स्थानिकतेचा मुद्दा उपस्थित करत पुणे शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद भूषवलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भाजपामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघावर उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार बांधणी सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपाचे मतदारसंघातील पदाधिकारी यांनी अमोल बालवडकर यांच्या कार्यक्रमाकडे काहीशी पाठ फिरवली असली तरी बालवडकर यांचे निकटवर्ती नेतृत्व राज्याच्या निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्याने बालवडकर यांच्या कार्यकर्त्यांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

कोथरूड मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये नेता विरुद्ध कार्यकर्ता असा तिकिटासाठी सुरू असलेला संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरत असून आगामी निवडणुकांमध्ये तिकीट कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अमोल बालवडकर यांनी कोथरूड मतदार संघामध्ये जोरदार भव्य कार्यक्रम घेत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रमांची मालिका सुरू केली आहे. तर आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष भेटी  व कार्यकर्त्यांच्या घरी भेटींचा धडाका लावला आहे. यामुळे कोथरूडच्या राजकारणाची भविष्यातील दिशा कशी असणार व कोण कोणाच्या विरोधामध्ये राहणार याबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

See also  जैन विचार मंचच्या वतीने 'आहार दिन' निमित्त 'ऊसाचे रसपान'