लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक असल्याचा संदेश देणारी ही सन्मानयात्रा – खासदार डॉ. अजित गोपछडे

पिंपरी-चिंचवड : वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा ही राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे. ही यात्रा हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे; आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे. हा संदेश देणारी यात्रा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे विरोधकांनी विष पसरवण्याचे काम केले; त्याला उत्तर देणारी ही यात्रा आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे अशी अपेक्षा राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केली.  

लिंगायत समाजातील युवक, तरुण व सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने राज्यात वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या असलेल्या १७ जिल्ह्यामध्ये भक्ती स्थळ (राजूर, अहमदपूर) ते शक्ती स्थळ (श्रीक्षेत्र मंगळवेढा) अशी लिंगायत सन्मान यात्रा जाणार आहे. ही यात्रा आज (रविवार, दी. २९) ६०विधानसभा मधील प्रवास करीत पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली. या निमित्त गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली, नेवाळे वस्ती येथे वीरशैव लिंगायत समाज सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे बोलत होते. 

यावेळी आमदार उमा खापरे, दानेश तिमशेट्टी (हिंदू वीरशैव लिंगायत मंच.पिंपरी चिंचवड शहर संयोजक), नारायणराव बहिरवाडे (महात्मा बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष), गुरुराज चरंतीमठ (मार्गदर्शक, हिंदू वीरशैव लिंगायत मंच), एस बी पाटील (मार्गदर्शक हिंदू वीरशैव लिंगायत मंच),संतोष यादवाडे,राष्ट्रीय जंगम समाजाचे अध्यक्ष श्रवण जंगम,आकाश पाटील,गणेश पाटील,मंगेश पाटील,चंद्रशेखर पाटील यांसह लिंगायत समाजातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

खासदार डॉ. अजित गोपछडे म्हणाले, ही यात्रा राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे. लोकसभेत मिळालेल्या अपयशाची कारण मीमांसा करण्यासाठी ही यात्रा नसून लिंगायत समाजाला एकत्रीत करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. तसेच या समाजातील बलस्थानांना ओळखून त्यांचा सन्मान करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. सध्या राज्यात जी जातीय तेढ निर्माण केला जात आहे; त्याला उत्तर म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले, लिंगायत समाजातील ५७ पोट जातींना एकत्र करून ही यात्रा समरसता आणि हिंदूतवाच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात मार्गक्रमण करत आहे. लिंगायत समाजाला एकत्रीत करणे, त्यांच्यात जनजागृती करणे, बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या व सरकारच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, लिंगायत समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळवून देणे, निवासी वस्तीच्या संदर्भात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक येथे युवकांना मोफत निवासाची सोय उपलब्ध करून देणे, लिंगायत समाजासाठी आरक्षित झालेल्या स्मशानभूमी किंवा दफन भूमी त्यांना मिळवून देणे; १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात दीड कोटी लिंगायत आहेत. त्यांचा गेलेला स्वाभिमान पुन्हा मिळवून देणे हा आमचा या यात्रे  मागील उद्देश आहे.  दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणासाठी पुणे आणि नवी मुंबई येथे भूखंडास मान्यता दिल्याचेही डॉ. गोपछडे यांनी सांगितले

या यात्रेचा सन्मान मंगळवेढा येथे होणार असून या सभेला लाखोंच्या संखेने समाज बांधवांनी यावे असे आवाहन करताना डॉ. गोपछडे ती समाजाची संकल्प सभा असेल असेही सांगितले. 

आमदार उमा खापरे म्हणाल्या, डॉ. अजित गोपछडे यांनी यापूर्वी डॉक्टर सेलच्या माध्यमातून राज्यभर प्रभावी कार्य केले आहे. आता राज्यसभा खासदारकी मिळाल्यानंतर त्यांनी लिंगायत समाजाला एकत्र करण्यासाठी काढलेली ही सन्मान यात्रा राजकीय नसून लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी आहे. 
या मेळाव्यात लिंगायत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान डॉ. गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आला.

See also  राष्ट्रवादी युवक काँग्रेस ( शरदचंद्र पवार) च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी सूरज पांडुरंग परदेशी यांची निवड