खडकवासला मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा भंग; विनापरवाना प्रचार फलक उभारला

पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रचारासाठी लावण्यात येणाऱ्या फलकांसाठी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, धायरी येथील मधुमालती सोसायटीच्या संरक्षण भिंतीवर परवानगीशिवाय प्रचार फलक लावल्याचे आढळले आहे.


दि. 30 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 31 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजेपर्यंत खडकवासला मतदारसंघातील भरारी पथक 6 ने आपल्या कर्तव्याच्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या Cvigil Investigator अँपवरून तक्रार प्राप्त केली. या तक्रारीत धायरीगाव भागातील मधुमालती सोसायटीच्या संरक्षण भिंतीवर मोठ्या फलकावर प्रचार सामग्री लावलेली असल्याचे नमूद करण्यात आले होते. फलकात पांढऱ्या रंगाच्या बॅनरवर मोठ्या अक्षरात संदेश लिहिलेला होता, ज्यामध्ये सोसायटीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची माहिती देण्यात आली होती.


भरारी पथकाने संबंधित ठिकाणी पोहोचून महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तत्काळ फलक काढून टाकला. फलक काढण्यापूर्वी त्याचे छायाचित्र घेण्यात आले असून, तक्रारीच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीतून संबंधित फलक कोणी लावला, हे अद्याप निश्चित झालेले नाही. याबाबत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशांनुसार परवानगीशिवाय प्रचार साहित्य लावणे आचारसंहितेचा भंग असून, प्रकरणावर पुढील तपास सुरू आहे.

See also  मांजरी बुद्रुकमधील रेल्वे उड्डाणपुलाला यंदा मुहूर्त नाहीच!भूसंपादन रखडले ; काम पूर्ण करण्यासाठी लागणार ४ ते ६ महिन्याचा कालावधी