‘सोवेतो’चा ‘बळी’ शिक्षणासाठी, जगातल्या विद्यार्थांसाठी….

सुनील माने :-
जगात ठिकठिकाणी आपापल्या धर्म, वर्णांचा वर्चस्ववाद ही मूलभूत समस्या आहे. ती वारंवार डोकं वर काढते. ‘आपली’ जनता वरचढ राहावी ही प्रेरणा खोल दबलेली असते आणि त्यात मानवी कल्याण, जग एक कुटुंब असं मानणाऱ्यांपासून आम्ही जगाचे त्राता असं समजणाऱ्यांच्या तकलादू भावना सतत समोर येतात.
सध्या आपल्याकडं सुरू असलेल्या ’नीट’ परीक्षेच्या गैरव्यवहारांपासून ‘व्यापम’ गैरव्यवहारापर्यंत अनेक घटना या प्रवृत्तींना उघड करणाऱ्या आहेत.
याच्या खोलात गेलं तर काय दिसतं? हीच अमानवी प्रवृत्ती जी मी वर सांगितली आहे, आपले प्रभुत्त्व ठसवत राहण्याची आणि त्यातूनच बाकीच्या घटकांना दाबून खाली खाली ढकलण्याची.

या पार्शभूमीवर आजचा दिवस त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जगात अत्यंतिक अन्याय, अत्याचार सहन केलेल्या अफ्रिकी नागरिकांच्या आणि पर्यायाने दबलेल्या समाजाच्या दृष्टीने.
१६ जून १९७४. दक्षिण अफ्रिकेच्या वर्ण संघर्षाच्या लढ्यात अत्यंत महत्त्वाचा दिवस. गोऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणि तसेच शिक्षण मिळावं, त्यांना ज्या सुविधा सरकार देतंय त्या आम्हालाही मिळाव्यात यासाठी तीसेक हजार लहानग्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या शांती मोर्चावर गोऱ्या सरकारच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आणि त्यात शेकडो मुलांच्या मरणात.

यात पहिला बळी गेला तो झोलिली हेक्टर पिटरसनचा. अवघा १२ वर्षांचा विद्यार्थी. आजच्या दिवशी.
या आंदोलनाचा, त्यावर झालेल्या गोळीबाराचा आणि त्यात हेक्टरच्या रुपात पहिला बळी जाण्याचा, त्यातून अफ्रिकी नागरिकांवरच्या अत्याचारांना वाचा फोडणारा हा दिवस. म्हणून तो महत्त्वाचा आहे. थोडक्यात शिक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात आणि त्यासाठी पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक समाजासाठी हा दिवस आणि ही घटना महत्त्वाची आहे असं मी मानतो.

दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्गमधील सोवेतो (South Western Townships) हा परिसर हे या आंदोलनाचे केंद्रबिंदू होता. तिथे या आंदोलनाच्या आणि हेक्टरसह बळी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत.

मी ऑगस्टमध्ये ‘नेल्सन मंडेला मंथ’च्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेला गेलो असताना आवर्जून सोवेतोच्या या स्मृती संग्रहालयात या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी भेट दिली. दक्षिण आफ्रिकेचे महान नेते नेल्सन मंडेला यांच्या घरापासून जवळ हेक्टर पिटरसनच्या नावे हे स्मृतीसंग्रहालय उभे केले आहे. या सर्व संघर्ष आंदोलनाने,  त्यानंतर झालेल्या संघर्षाची, स्मृती जतन करण्यासाठी सर्व गोष्टींची जपणूक करत असतानाच या आंदोलनाची पार्श्वभूमी, इंग्रजांनी केलेला गोळीबार याची सर्व माहिती त्या संग्रहालयात आपल्याला मिळते. (मी त्याची काढलेली काही छायाचित्रे त्याची माहिती देतील)

तीस हजार विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सुरू झालेली चळवळ शेकडो विद्यार्थ्यांचा बळी घेत संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत पसरली तिचे दक्षिण आफ्रिके बरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही गंभीर परिणाम सुरू झाले त्यातून 16 जून ‘डे ऑफ द आफ्रिकन चाइल्ड’ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखला जातो

ब्लॅक कॉन्शियस मोमेंट (बीसीएम) आणि साऊथ आफ्रिकन ऑर्गनायझेशन यांनी वंशविरोधी सरकारच्या वागणुकीच्या विरोधात ॲक्शन कमिटीद्वारे हजारो विद्यार्थ्यांच्या शांतता मोर्चावर पोलिसांनी हल्ला केला. त्यांनी अश्रूघूर आणि नंतर गोळीबार करून विद्यार्थांना ठार केले. हे आंदोलन सोवेतोमध्ये सुरू होऊन नंतर संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत पसरलं.  या घटनेच्या नंतर गोऱ्या सरकारच्या विरोधात देश विदेशात वातावरण सुरू झाले.  जगाला वंशद्वेशी वागणे म्हणजे काय याची तीव्रता जाणवू लागली. त्या विरोधात चळवळी आणि नेतृत्त्व तयार होऊ लागले.

आपल्या देशात शिक्षणाचा हक्क मिळणे, त्यातही गोरगरीब जनतेला योग्य आणि स्पर्धात्मक युगात टिकता येईल असे शिक्षण मिळणे हे अनेक शतकांची गरज कशी पूर्ण होईल असा आजही प्रश्न आहे.  स्वतंत्र भारतात वेगवेगळ्या योजना करून, आपण शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. सर्व शिक्षा अभियान ‘राईट टू एज्युकेशन’ अशा स्वरूपाची योजना करत व्यापक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या परिघात आणण्याचा आपण सुयोग्य प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने तो अनेकवेळा हाणून पाडला जातो. गेल्या काही काळात स्पर्धात्मक परीक्षा आणि त्यासंबंधीचे विविध प्रकार यात सर्वोच्च न्यायालयाला दखल घेऊन हे सगळे प्रकार रोखावे लागतात ही स्थिती बनली आहे.  दक्षिण आफ्रिकेत 16 जूनला झालेली ही चळवळ त्या पार्श्वभूमीवर आपल्याला रिलेट करता येऊ शकते. शिक्षण मिळवणं त्याद्वारे समाजातील सर्व स्तरांमधल्या विद्यार्थ्यांची एकरूप अशी पातळी साधणे,  त्यातून विकास घडवून आणणे हा मुख्य मुद्दा आहे. याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे मी पाहतो. भारतातल्या दलित, मागास, ओबीसी, आदिवासी या समाजातल्या विद्यार्थ्यांना आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे दुर्दैवी असले तरी पूर्ण सत्य आहे. हा संघर्ष अत्यादृष्टीने भारतासाठी ही एक दिशादर्शक ठरू शकतो

काही नागरिकांना दुय्यम वागणूक देत राहणे, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आणि त्यामुळे विकासाच्या संधी नाकारून आपल्या स्पर्धेत येऊ न देणे याची व्यवस्था करणारी विचारसरणी अशा गोष्टींचे पोषण करत राहते. पण अशी विचारसरणी जगभरात सतत पराभूत होत राहते. मात्र त्यासाठी संघर्ष करावा लागतो. हेक्टर पिटरसनचा बळी हेच सांगतो.

सुनील माने
१६ जून २०२४.
नवी दिल्ली.

See also  रशियातील सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि महाराष्ट्र विधानमंडळादरम्यान सामंजस्य करार