भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा

पुणे : मराठीला जर खरच अभिजात दर्जा द्यायचा असलेतर तो अंतःकरणातून देणे गरजेचं आहे, कल्पनाशक्ती शिवाय कला आणि शास्त्र दोन्हीही चालू शकत नाही, कल्पनाशक्तीला कधी थांबू देऊ नका, सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे, जगरूपी बाजारात जर स्वतःला सिद्ध करायचे असेल तर आपले म्हणणे अचूक शब्दात मांडता येणे व भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे आणि हे साध्य होऊ शकते ते वक्तृत्व स्पर्धेमधून असे प्रतिपादन पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. आशुतोष नेर्लेकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई मान्यताप्राप्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये करण्यात आले होते. स्पर्धेचे यंदाचे १६ वे वर्ष असून यावर्षी राष्ट्रीय पातळीवरील ३० तंत्रनिकेतनमधील ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्राचार्य श्री. राजेंद्र उत्तूरकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व स्पर्धा आयोजना मागची पार्श्वभूमी विशद केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धेचे परीक्षक श्रीमती कविता मेहेंदळे व श्री. घनश्याम वाईकर यांनी विद्यार्थ्यांनी ज्या विषयाचे चांगले आकलन आहे त्या विषयाची निवड करून स्वतः ज्या भाषेत उत्तम संवाद साधू शकतो तीच भाषा निवडावी आणि सगळ्यात महत्वाचे वाहवत न जाता वेळेच्या बंधनाचे भान ठेवून आपले वक्तृत्व सादर करावे अशी आशा व्यक्त केली.

स्पर्धेमध्ये कुसरो वाडिया तंत्रनिकेतन, पुणे मधील कु. राशी भावेकर हिने प्रथम पारितोषिक मिळविले, भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई मधील कु. भूमिका नवले हिने द्वितीय पारितोषिक, तर भारती विद्यापीठ जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, पुणे मधील कु. साक्षी लोंढे हिने तृतीय पारितोषिक मिळविले, याव्यतिरिक्त पाच विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रा. उदय पवार, प्रा. तानाजी कणसे, डॉ. वैशाली फाळके, उपप्राचार्य श्री. अमित पाटील व श्री. ऋषिकेश देशमुख, सर्व स्पर्धक, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित राहिले. पारितोषिक समारंभाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक प्रा. श्री. शुभम शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रतीक सगळगिळी, ज्ञानेश्वरी पार्टे, सिद्धी ढेरे, साक्षी लोंढे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. संगिता लाड यांनी केले.

See also  मुख्यमंत्र्यांनी कोरटकर प्रमाणे आर एस एस चे भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करावं -उद्धव ठाकरे