बाणेर : प्रथमेश पार्क बाणेर चाकणकर मळा सर्वे नंबर 150/5/1 येथील शुभम अपार्टमेंट बांधकाम पाडत असताना इमारत रस्त्यावर कोसळली यामुळे रस्त्यावरील विद्युत विभागाचे खांब व झाडे तुटून जवळील इमारतींवर पडल्याने इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जेसीबी व पोकलेन च्या साह्याने प्रथमेश पार्क येथे इमारत पाडण्याचे काम सुरू होते. बांधकाम पाडत असताना योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. इमारतीच्या खालील कॉलम पोकलेन च्या साह्याने तोडण्यात आल्यानंतर इमारत रस्त्याच्या बाजूला झुकली व मोठा आवाज होत रस्त्यावर पडली. यावेळी मोठे झाड इमारतीच्या मुळे शेजारील इमारतीवर कोसळले यामुळे शेजारील इमारतीचे तसेच नागरिकांच्या घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चाकणकर मळा येथे बांधकाम व्यावसायिक बिल्डर सुनील माथेरेजा यांच्या प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येणार आहे यासाठी जुनी इमारत काढण्याचे काम सुरू होते. बांधकाम पाडण्यासाठी परवानगी न घेता आजू बाजूच्या रहिवाश्यांना न सांगता कोणत्याही प्रकारच्या सेफ्टी प्लॅटफॉर्म न लावता बिल्डिंग पडण्याचे काम केले जात होते.
दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिक थोडक्यात बचावले. या परिसरात आजूबाजूच्या इमारतीतील लहान मुले खेळत होती. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु आजूबाजूच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर बांधकाम व्यवसायिकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे.