शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा कार्यान्व‍ित करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील 23 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयांमध्ये एमआरआय व सिटी स्कॅन सेवा कार्यान्वित आहेत. मात्र, वाढती रुग्ण संख्या असल्याने त्याकरिता प्रतिक्षा यादी आहे. त्यामुळे या रुग्णालयात अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा निर्माण करुन तात्काळ एमआरआय व सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करुन देण्याच्या तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजी सेवा पुरविण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उप सचिव प्रकाश सुरवसे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, ‘आयुष’चे संचालक डॉ. रमण घुंगराळकर, अवर सचिव सुनीलकुमार धोंडे तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करण्यासाठी खासगी  सार्वजनिक भागीदारी (PPP) धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार विभागाच्या अंतर्गत शासकीय संस्थांमध्ये अद्ययावत रेडिओलॉजी व पॅथालॉजी केंद्रे सुरू करण्यात यावीत. संबंधित संस्थांनी याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

See also  10 वीचा पेरिविंकल इंग्लिश मीडियम शाळेची 100% निकालाची परंपरा कायम