पुणे : स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांची माहिती पुणेकरांना व्हावी; यासाठी ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त श्री देवदेवेश्वर संस्थाने प्रदर्शनी उभारण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी ना. पाटील यांनी राष्ट्रध्वजाचे पूजन करुन सर्व क्रांतिकारकांना अभिवादन केले. यावेळी पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, ॲड. मंदार रेडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. पाटील म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असंख्य राष्ट्रभक्तांनी योगदान दिले. अनेकांनी बलिदान देखील दिले. त्यांचे स्मरण ठेवणे आपली जबाबदारी आहे. श्री देवदेवेश्वर संस्थानने पुणे शहर आणि जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची नव्या पिढीला ओळख व्हावी, यासाठी राबविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, अशी भावना व्यक्त केली.